Friday 5 April 2019

गुढी उभी करा आनंददायी ! पर्यावरण पूरक !

गुढीपाडवा स्पेशल

मित्रांनो,
आपण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असतो, नविन वर्षाचा आनंद, घरात पुरणपोळी आणि साखरगाठी खाऊन तोंड गोड करतो, संध्याकाळी गुढी उतरली आणि काठी माळावर टाकून देतो, काही ठिकाणी ज्या काठीवर आज साडी असते त्याच काठीवर दुसऱ्या दिवसापासून कपडे येतात. असो..!

आपण सारे भारतीय सण आणि उत्सव आपण खूप चांगल्या पद्धतीने साजरे करतो. पण आज-काल जी शो ऑफ किंवा दिखावा करायची पद्धत आपल्या समाजात रुळलेली आहे ती खरे तर खूप चुकीची आहे.

आपले सण आणि उत्सव हे कायमच पर्यावरण पुरक होते आणि राहतील, पण त्या मध्ये काही जणांनी जे काही नवीन नको असलेल्या पद्धती घुसवल्या आहेत ते नक्कीच चांगले नाहीये.

दरवर्षी दसऱ्याला कोल्हापूर मध्ये १७ ते १८ टन आपटा तुटतो, जो संध्याकाळी रोडवर पसरलेला असतो, अगदी काही तासातच !

खरे तर पांडवांनी शस्त्रे शमी च्या झाडावर लपवली होती, कालांतराने शमी ची झाडे कमी झाल्यामुळे आपण आपटा वापरू लागलो, आणि आता आपण आपटा कमी झाल्यामुळे कांचनारची पाने वापरतोय.

वास्तविक हा तुटलेला आपटा आपण गाई आणि म्हेशींसाठी वापरू शकत होतो, आपट्याच्या पानामुळे जनावरांच्या दुधात वाढ होते.

आता पण सध्य स्थिति वेगळी नाहीये. कोल्हापूर मध्ये आणि आसपास जवळ साधारणतः ४ लाख गुढ्या उभा राहिल्या आणि तेवढेच बांबूं तुटले गेले व कडुनिंबाची झाडे पण तुटलीत.

बांबू आणि तत्सम वर्गीय वनस्पती हे हत्ती आणि गव्यांचे खाद्य आहे, तसेच पर्यावरणासाठी सुद्धा हि झाडे महत्वाची आहेत, पण आता बांबू व तत्सम झाडे कमी झाल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वावर गदा आलेली आहे.

शिवाय आपल्याला हे माहित आहेच की पश्चिम घाटात कडुनिंबाची झाडे येत नाहीत जी फक्त माळरान किंवा सपाटीवरच येतात, आजकाल उन्हाचा तडाखा किती वाढला आहे हे पण आपण पाहताच आहे, कडुनिंब एक औषधी झाड आहे जे उपयोगी आहे तसेच गरजेच्या वेळी माळरानावर उन्हापासून वाचण्यासाठी सुद्या उपयोगी पडते,आणि अश्या प्रकारे जर आपण जसे तोडायची ठरवली तर मग आधीच वाढलेल्या ठिकाणी जमिनीची धूप वाढेल आणि तापमान पण वाढणार.

मी संस्कृतीच्या विरोधात नाहीये पण संस्कृतीच्या नावाखाली जे विकृतीकरण चालू झालय ते मला पटत नाही. याचा अर्थ असा नाहीये की गुढ्या उभ्याच नका करू, त्यापेक्षा एक काठी किती दिवस वापरता येईल याकडे लक्ष द्या आणि शक्य झाल्यास फक्त झाडे तोडणे कमी करा, लावायची तशी पण कोणती ते बऱ्याच लोकांना माहीत नसते !

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि उत्सव पर्यावरण पूरक आहेत आणि अशी संस्कृती जगात सर्वमान्य झालेली असताना आपण त्या संस्कृतीमद्ये विकृती का निर्माण होऊ देतोय हे मला कळतं नाहीये ?

गुढी पाडव्याच्या एक बांबु किमान ६ ते ७ वर्ष तरी चालू शकतो, माझ्या स्वतःच्या घरातील गुढीची काठी गेली १० वर्षे झाली आम्ही वापरतोय, दर वर्षी नवीन काठी घ्यायचा अट्टाहास का..? आणि मार्केट मध्ये सण आणि उत्सवाचे जे बाजारीकरण झालंय ते कधी थांबणार..?

(गुढीची काठी घेताना बऱ्याच जणांना काल परवा हा अनुभव आलेला असेलच)

आपण आपले सण आपली संस्कृति जतन केलीच पाहिजे पण मूळ बेसिक गोष्टी समजून ती आहे तशी ठेवणे हे आपले कर्तव्य नाही काय?

चूक भूल दयावी घ्यावी पण मनात आले म्हणून एवढा मोठा लेख लिहिला..!  कारण मला तर या वर्षी उन्हाळा खूप जाणवतोय..!

आपला,
उमाकांत चव्हाण,
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

No comments:

Post a Comment

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...