Friday 5 June 2020

सत्य..? जंगल वाचवणे गरजेचे आहे ?

*पर्यावरण दिन विशेष (गरज आहे लिहण्याची ? कायम लिहतोय पण खरंच उपयोग होतो ?)*
©उमाकांत चव्हाण.
*आजच्या काही बातम्या*
● सकाळी टिव्हीला पाहिले, 
सॅनफ्रान्सिस्को मध्ये लागलेला महाभयानक वणवा..
● नोर्व्हे मध्ये झालेले अचानक भूस्कखलन...
● मेक्सिको मध्ये आलेलं चक्रीवादळ..
● चीनमध्ये पडलेला मुसळधार पाऊस आणि प्रचंड गारा...
● जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरसच्या रुग्णात प्रचंड वाढ...

या सर्व घटना म्हणजे विनाशाच्याकडे जाणारा मानवजातीचा रस्ता आहे, या घडणाऱ्या घटना अशाच घडत नाहीयेत, निसर्ग कोपला असे देखील कधीकधी आपण म्हणतो परंतु जर गेल्या पन्नास वर्षांचा जर तुम्ही विचार केला तर या घटना का घडल्या यासंदर्भात ची माहिती तुम्हाला मिळू शकते. आपण पर्यावरण निसर्ग याची संपूर्णपणे वाट लावली आहे.  भरमसाठ वृक्षतोड, घाटरस्ते, रेल्वे मार्ग आणि शहरांची झपाट्याने होणारी वाढ आणि त्यामुळे संपुष्टात येणारे वन्यजीवन या  घटना साध्यासुध्या नाहीयेत. 

या घटनांच्या जर तुम्ही मुळाशी गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की आपण कित्येक पटीने पृथ्वीचा विनाश करत आहोत. 

◆ अगदी दररोज एकट्या दिल्ली आणि मुंबईमध्ये आपल्या देशात जितके कार्बन उत्सर्जन होते त्याच्या जवळपास निम्मे होत आहे.

◆ दरवर्षी सरासरी मुंबईकर ३.८३ टन्स कार्बन डाय ऑक्साईड सोडतात, जे मुंबई आणि पुणे दरम्यान (१६५कि.मी. अंतर) ७६ फेऱ्या मारणाऱ्या छोट्या पेट्रोल कारमधून उत्सर्जनाच्या समतुल्य आहे. 

◆ मुंबईची कार्बन फूटप्रिंट कार्बन डाय ऑक्साईडच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे.

◆ २००५ पासून १३ लाख झाडे बेकायदेशीरपणे सरकारी जंगलात कापली गेली आहेत (सरकारी आकडे) आणि महाराष्ट्राला त्याच्या मौल्यवान वन संपत्तीपासून वंचित ठेवले आहे. वनक्षेत्रातील वृक्षांची संख्या ही राज्यातील जंगलांमधील एकूण झाडाच्या ताकदीचा एक छोटा भाग असू शकते, तथापि, ही चिंताजनक घसरण आहे, असे वन अधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जिथे गरजेची आहेत तिथे राजकारण आडवे करत झाडे तोडली नाहीत तर जिथे गरज नाही प्रचंड जैवविविधता आहे तिथं भसाभस खाणकाम उद्योगाला परवानगी मिळत आहे आणि परिणामी  या भागातली वृक्षतोड होत आहे २०१४ ते २०१७ मध्ये खाणकामासाठी महाराष्ट्रातील ६३४६ हेक्टर जंगल भाग संपवला.

◆ गेल्या पाच वर्षात मुंबईमध्ये १९०२८ प्राण्यांवर घातक केलेल्या क्रूरतेची प्रकरण आणि उघडकीस आलेले आहेत यातील कोणालाही अटक झाली अशी माहिती बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रूल्टी ऍनिमल यांनी संकलित केली आहे गेल्यावर्षी गाईला मारहाण केलेल्या प्रकरणात चार जणांना अटक केली आरोपींनी जामीन पत्र म्हणून ४०००/- रुपये भरले परंतु स्थानिक कोर्टाने कायद्यानुसार त्यांना केवळ ५०/- रुपये दंड ठोठावला आणि ३८०० रुपये परत देण्यात आले असल्या कायद्याने खरंच देशाचं भलं होणार आहे का ? यावर विचार करण्याची गरज आहे.

◆ आपण गरजेपेक्षा जास्त नैसर्गिक ऊर्जास्त्रोत वापरलेले आहेत आणि ते संपुष्टात आल्यानंतर आपण नवीन ऊर्जास्रोताकडे झपाट्याने चाललो आहोत आणि त्यासाठी आपल्या धावपळीत आपण आपल्या देशातील समृद्ध जंगले पटापट तोडून टाकून त्या ठिकाणी नवनवीन विकास प्रकल्पाने उद्योगधंदे उभे करत आहोत.

◆ याचा परिणाम अनियमित पर्जन्यमान, चक्रीवादळ, महापूर, ढगफुटी, सुनामी, भूस्खलन  यासारख्या गोष्टीतून आपल्याला दिसू लागलेला आहे आणि समोर जे संभाव्य धोका दिसतो त्या वेळेस ही आपण जर अलर्ट झालो नाही तर आपल्या सारखा मूर्ख मंदबुद्धी माणूस कोणीही नसेल.

आपण आपल्याकडे होते ते संपवले तर आहेच परंतु दुसऱ्याचं ओरबडून घेण्यात देखील आपल्याला धन्यता वाटते आणि याच कारणामुळे आपण आपल्या पृथ्वीवर जी सदाहरित निमसदाहरित पर्जन्य जंगलं आहेत ती संपवण्याचा आता घाट घातलेला आहे.

◆ पर्यावरण दिन हा फक्त एक मेसेज टाकून खरच साजरा करू शकतो का ? यावर आता प्रश्नचिन्ह उठलेला आहे.

दरवर्षी पर्यावरण दिन येतो आणि दरवर्षी एखादा आर्टिकल यावर पोस्ट करतो परंतु आता मला सुद्धा स्वतःचीच लाज वाटत आहे की आपल्या देशात आपण पर्यावरणाचे काम करण्यात किती कमी पडत आहोत आणि कितीही प्रयत्न केले तरी आपल्या देशातील पर्यावरण वाचवणे करिता आपण निष्फळ प्रयत्न करत आहोत, कारण की जिथं वाचवायला पाहिजे होते ती तारीख २०१३ ला आपण ओलांडली. 

समोर विनाश दिसतो आहे तरी देखील जर माणसाला समजत नसेल तर यापेक्षा वाईट कुठलीही गोष्ट जगात असणारच नाही. पृथ्वीचा विनाश तर आपण करतच आहोत, परंतु आता आपले प्रयत्न दुसऱ्या ग्रहांवर जाऊन त्या ग्रहांचा देखील विनाश करण्याचे कार्य चालू झालेले आहेत. या प्रयत्नांना काही लोक *विज्ञान (हे असे असते ?)* म्हणतात याबद्दल खरंच त्यांची कीव वाटते.

दरवर्षी असे पर्यावरण समृद्ध आणि जंगल वाचवण्याकरता प्रयत्न करणारे लेख टाकून आता मला देखील कंटाळा आला आहे. का करायचं हे सगळे ? ज्या माणसाला कसलीही नियम पाळायचे नाहीत, अगदी मग तो जीव धोक्यात घालणारा (लॉकडाउन) जरी असला तरीदेखील आम्हाला कसलीच नियम पाळायचे नाहीत तर मग पर्यावरणाचे नियम कोण पाळणार ? अगदी साधी गोष्ट आहे कोरोना सारख्या महामारी पासून आपल्याला वाचावी नाही करता शासनाने लॉकडाऊन जाहीर केलं त्यात काही त्रुटी असू शकतील याबद्दल वादच नाहीये परंतु आपली स्वतःची जबाबदारी जर आपल्याला कळत नसेल ती देखील आपल्याच घरातल्यांच्या सुरक्षितते करिता तर देश हिताचा विचार कोण करणार ? (खरं सांगा किती जणांनी वर लिहिलेले आकडे वाचले आणि लक्षात ठेवले ? बोललो ना भावना बोथट झाल्या आहेत)

◆ आपल्या देशात होणारे पर्यावरणाचे नुकसान हे कधीही न भरून येणारी इतका आहे आणि दररोज ते होत आहे केंद्र शासनाने पश्चिम घाटातल्या गावाबद्दल जे कायदे केलेले आहेत ते खूपच गडबडीत घेतलेले निर्णय आहेत, यामागचं *काळ राजकारण* काढत बसायला वेळ नाहीये, परंतु पश्चिम घातली ही समृद्ध जंगले वाचवणं हे १००% आपलेच कर्तव्य आहेत आणि याकरिता कुठल्याही माणसाच्या विरोधात उभा राहिला प्रत्येक जण निश्चयानें तयार झाला पाहिजे. 

इथ तू आणि मी करणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या देशात कधीही सुधारणार नाही हे कितीतरी महान तत्वज्ञ सांगून गेले आहेत, हे सर्व आपल आहे असं मानून ज्या दिवशी काम करायला सुरुवात होईल त्याच दिवशी खरच आपण पुन्हा एकदा जागतिक पर्यावरण दिन साजरा करू शकू.

©उमाकांत चव्हाण.

Saturday 9 May 2020

मलबारी धनेश - प्रेमाची निशाणी

Mother's Day Special.
मलबारी धनेश - प्रेमाची निशाणी

पश्चिम घाटात मलबारी धनेश ही प्रदेशनिष्ठ प्रजाती सापडते, ही  पक्षाची प्रजात अत्यंत देखणी व सुंदर असतेच, परंतु त्यांचे वर्तणूक देखील तितकीच गूढ रम्य आणि आश्चर्यकारक आहे.

या प्रजाती मधील नर हे मिलन काळानंतर मादीची खूप चांगली काळजी घेतात. नर आणि मादी हे दोघेही ही प्रजननासाठी घरट्याचा शोध घेतात. 

एका उंच झाडावर असलेल्या बारीकशा ढोलीमध्ये अंडी घालण्यासाठी मादी बसते, त्यानंतर ते दोघे त्या घरट्याचं तोंड मातीने-चिखलाने लिपून घेतात. 

मादी जवळजवळ दोन पेक्षा जास्त महिने त्या घरातच स्वतःला lockdown करून घेते.

या दरम्यान नर सतत दिवसभर राबत असतो. तिच्या खाण्यापिण्याची सोय तो बाहेरून आणून करत असतो आणि फक्त चोच जाईल इतकाच घरट्याचा भाग उघडा केलेला असतो त्यातून तो तिला दोन ते अडीच महिने सतत भरवत असतो.(This is true love for me as I have veer seen)

यादरम्यान अंड्यातून बाहेर आल्यानंतर पिल्लांना भरवण्याची जबाबदारीदेखील यालाच असते.

अशा पद्धतीच्या या दुर्मिळ देखण्या आणि अनोख्या पक्षाचे दर्शन आपल्या पश्‍चिम घाटात आपल्याला सहज पाहायला मिळते, परंतु दुर्दैवाने आपण विकासाच्या मार्गात अनेक घाटरस्ते निर्माण करत आहोत आणि जंगलं नष्ट करत आहोत परिणामी मोठाली झाडे नष्ट झाल्यामुळे या पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहे आणि कदाचित हे पक्षी देखील लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर परिक्रमण करत आहेत.
©उमाकांत चव्हाण
Sahyadri conservation Society.

Thursday 9 April 2020

लॉकडाउन...!

© उमाकांत चव्हाण | Umakant Chavan.

तुमच्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लोक डाऊन केला, सगळेजण सध्या घरात बसले आहेत. आम्ही मात्र बिनधास्त फिरत आहे जंगलामध्ये...!

तुम्हाला घरामध्ये दहा दिवसात जो "लॉकडाऊन" चा अनुभव आलाय तो गेली कित्येक वर्ष आम्ही तुमच्या या अघोरी पर्यटनामुळे जंगलात अनुभवतोय...

तुम्ही आमच्या जंगलात बोंबलत फिरता आणि तुमच्या भेटीमुळे आम्हाला एकाच ठिकाणी घाबरून जीव मुठीत धरून बसावे लागते. 

शेवटी तुमच्या पंतप्रधानांनी आम्हाला मुक्त केले याबद्दल त्यांचे धन्यवाद. 

सध्या आम्ही निर्धास्त रस्त्यावर गावातून, शहरातून, जंगलातून फिरत आहोत. जग किती मोठ आहे हे आम्हाला कधी दिसलच नाही, कारण आम्हाला आमच्या घरात मानवाने कायमचे "लॉकडाऊन" करून ठेवले होते. खूप इच्छा व्हायची की थोडसं भटकून याव, पण आम्ही जंगलाच्या आजूबाजूला जरी दिसलो, तरी तुमच्यातले लोक आम्हाला हौसेखातर आणि पैशासाठी गोळ्या घालून ठार  मारायचे. मग आम्ही आमचं ते सुख, आमचा आनंद, गुंडाळून ठेवून मरणाच्या भेटीने जगण्यासाठी धडपड करत आमच्याच उरल्यासुरल्या तुकड्याच्या (तुकडे तुम्ही केले) जंगलात "लॉकडाऊन" असायचो.

कसं वाटतय आता ? खरं सांगा ना ! 

एखादा लॉक डाऊन असणे म्हणजे जीव वाचवणे आहे, परंतु ती एक दुर्दैवी सजा आहे हे तुम्हाला गेल्या दहा दिवसात कळलंच असेल. 

आम्ही ती गेले कित्येक वर्ष भोगतोय..आमच्या जंगलात... आमची चुक नसतानाही... फक्त तुमच्यामुळे... 

इथून पुढे आम्हाला जंगलामध्ये "लॉकडाऊन" करताना भारतात झालेले लॉकडाउन एकदा आठवुन बघा... 

चारही बाजूला फेन्सिंग आणि जाळ्या लावून तुम्ही आम्हाला आमच्या उरल्यासुरल्या छोट्याशा जंगलात बंदिस्त करून टाकलं, कित्येक पक्षी एक बाय दोनच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झालेले आहेत. धडपड चालू आहे ती जगण्याची... पंख फडफडवून निळ्या आकाशी झेप घेण्याची... परंतु ही स्वप्न देखील त्यांची आता संपली आहेत. कारण की त्यांना आयुष्याने कायमचे लॉकडाऊन केलेले आहे. 

कर्नाटकात रस्त्यावर फिरणारे गवे, हरणं, हत्ती, मुंबईमधे या रस्त्यांवर मुक्तहस्ताने आपल्या या सुंदर पिसाऱ्यांचे रंग पसरणारे मोर..! हे सध्या लॉकडाउन मुळे बाहेर आलेले आहेत. 

हजारो वर्षानंतर त्यांना आपली पृथ्वी पाहता आलेली आहे. ही त्यांची पिढी खरंच खूप भाग्यशाली आहे, कारण की आम्ही तुम्ही केलेल्या लॉकडाउन मध्येच आमचं सर्व आयुष्य संपवले...किमान या पिढीला तरी मुक्तपणे रस्त्यावर फिरता आले. 

तुम्ही निसर्गावर-प्राणिमात्रांवर जो अन्याय केलाय तोच तुमच्या मुळावर कधीनाकधी उठणार, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा..! 

आमचा बदला तो निसर्ग कधी ना कधी तुमच्याकडून योग्य पद्धतीने घेणारच विचार करा आणि कदाचित या रोगामुळे तुमचे "स्वातंत्र्याचे आणि लॉकडाऊन" चे विचार बदलतील...!

तुमच्या लॉकडाऊन मुळे जंगलामध्ये स्वतःचे आयुष्य संपवलेला - एक वन्यजीव..!

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...