Sunday 21 July 2019

गटारी म्हणजे फक्त दारू पिणेच का ? Umakant chavan

गटारी जवळ आली आहे ?

©उमाकांत चव्हाण.

खरंच मला या विषयावर लिहावं असं बरेच दिवस वाटत होतं, योगायोगाने दुपारी एक मित्र भेटला आणि बोलला यंदा गटारीला बाहेर जाऊया..!

तसं पण नॉनव्हेज खानं मला जास्त आवडत नाही, त्यामुळे बाहेरचं नॉनव्हेज शक्यतो टाळतोच... परंतु *गटारी* म्हणजे काय ? हा प्रश्न तसाच डोक्यात राहिला. आज घरी आलो आणि ठरवलं या माझ्या देशातल्या सुंदर परंपरे मधल्या *दीप अमावस्येला* ज्या लोकांनी *गटारी* म्हणून नवीन नाव दिलेला आहे हे एकंदरीत आलं कसे ? यावर थोडासा प्रकाश टाकावा, म्हणून हा एवढा लेखन-प्रपंच...!

खरंतर *गटारी अमावस्या* हा सणच भारतीय संस्कृतीत कुठेच नाही. गटारी अमावस्या ही आपण निर्माण केलेली वृत्ती आहे. गटारी म्हणजेच अपभ्रंश झालेला *गत-आहार* हा शब्द आहे, गत आहार म्हणजे जुना किंवा पूर्वीचा आहार यामध्ये आदिम काळापासून मासाहार चालू असायचा. आदिम कालखंडात लोक शिकार करून जगायचे. त्यानंतर आपल्या देशात शेतीप्रधान संस्कृती निर्माण झाली. परंतु या *गत-आहाराला* गटारी नावाने (अलंकारिक ?) केलं गेलं आणि आणि या दरवर्षी श्रावणाच्या आधी येणाऱ्या अमावस्येला आपण गटारी अमावस्या म्हणू लागलो.

*शुभम करोति कल्याणम, आरोग्यम् धनसंपदा..
शत्रूबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते..!*

आपल्या संस्कृतीत पंचमहाभूतांना प्रचंड महत्त्व दिले गेले आहे. या पंचमहाभूतांना मध्ये *अग्निदेव* म्हणजेच आपल्या घरातील दिवा ज्याचे स्थान प्रत्येक देवघरात, शुभकार्यात खूप महत्त्वाचे मानले जाते. हा दिवा आपण केलेल्या कर्माची साक्ष म्हणून मानला जातो. शास्त्रातही असंच म्हणलं गेलेला आहे की, दिव्याला साक्षी किंवा अग्नीला साक्षी मानून मी हे व्रत करतो. तसेच अग्नीला साक्षी मानून आज देखील आपले लग्न ठरते.

*अग्नीची* जी मूलभूत संरचना आहे किंवा अग्नीचे स्थान आपल्या संस्कृतीत आहे ती खूप मोठी आहे. त्या समईतील *ज्योतीकडे* पाहून आज देखील आपण प्रसन्नतेने चेहऱ्यावर आनंद आणतो आणि आणि घरात कितीही अंधकार  असेल तरीही त्या ज्योतीतील अग्नि आपलं घर स्वच्छ व प्रकाशमान ठेवण्याकरिता प्रयत्न करत असतो.

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी सर्व दिव्यांची पूजा करायची, रांगोळी काढायची, पाटावर दिवे मांडून त्यांना गंध-अक्षता-फुलं वाहायची आणि नमस्कार करायचा. त्याला नैवेद्याला  कणकेचे गोड दिवे ठेवण्याची परंपरा देखील काही ठिकाणी आहे.

असा हा भारतीय संस्कृतीतील अतिशय सुंदर सण पंचमहाभूतांना साक्षी मानून साजरा केला जातो. त्या सणाला *दिव्याची अमावस्या* किंवा *दीप-अमावस्या* मानले जाते त्याचा अमावस्येला आज काल गटारी अमावस्या म्हणून दारू ढोसायची नियमबद्ध परंपरा करण्याचे अवडंबर समाजात रुजले गेले आहे ते खरंच चुकीच आहे असं मला वाटतं.

गटारी अमावस्या म्हणजे फक्त दारू पिण्याचा दिवस ! बास एवढा एकच विचार समाजात रूढ झालेला आहे आणि आपली नवीन पिढी व्यसनाधीन होऊ लागलेली आहे.

असा कोणताही धर्म खरंच सांगतो का की दारू प्या, कोंबडी आणि बकरे कापा व पार्ट्या करा ?

बहुदा कोणताच धर्म असे सांगत नाही, पण आजकाल बरेच लोक खुलेआम नियम परंपरा धाब्यावर बसवून चंगळवादाला आपलंसं करत आहेत. याचा धोका त्यांच्या स्वतःच्या शरीराला व भावी पिढीला देखील नक्कीच आहे. दारू पिणे किंवा मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत माझं कुठलंही मत मी मांडू शकणार नाही कारण की ज्याचं त्याला कळतं किती पिली पाहिजे ? का नाही ? परंतु आपल्या संस्कृतीतील आपल्या परंपरेतील असलेल्या चांगल्या सणांना आपण जर हिणवून *गटारी अमावस्या* असे नाव देत असेल तर ते नक्कीच योग्य नाही असे मला वाटते.

दीप-अमावस्या साजरी करणे हा आपल्या परंपरेतील उत्कृष्ट सण त्या दिवसापासून श्रावण चालू होतो व श्रावणात मांसाहार वर्ज्य केला जातो, असे मानले जाते. परंतु असं कुठेही नोंद नाहीये की श्रावणाच्या आदल्या दिवशी भसाभसा बकरी आणि कोंबडी कापून पोट भरून घ्या व महिन्याभराची दारू एकदम ढोसून घ्या.

इथून पुढे आपल्या संस्कृतीतील गत-हारी या सणाला आपण "दीप अमावस्या" या नावानेच संबोधून आपली परंपरा आणि आपले सण अबाधित ठेवू असं मला वाटतं. आपल्या परंपरेचा आदर करून आपल्या देशातील संस्कृतीचा आदर करून पंचमहाभूतांच्या बद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच *दीप-अमावस्या* होय.

(कृपया हा लेख संपूर्णतः माझ्या वैयक्तिक विचारांशी निगडीत आहे यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा कसलाही हेतू नाही)

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

Friday 12 July 2019

कमळगडाच्या पाठीवर...! Fort Kamalgad


कमळगड / कमालगड
जिल्हा - सातारा
उंची - ४२०० फूट.

©Umakant chavan.

संपूर्ण जावळीच सुंदर...! जावळीच्या खोऱ्यात धोम धरणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. जावळीच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गडकोट अलंकारासारखे धारण केले आहेत, त्यापैकी एक आहे कमळगड..!

दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक दोन्ही बाजूच्या पाण्यातून कमळ वरती यावे तसा एक देखणा किल्ला वर आलेला आहे तो म्हणजे कमळगड. दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.

जावळीच्या खोऱ्यात वाई मधून दोन मार्ग कमळगडाला गेलेले आहेत, एक आहे वाईहून नांदवणे गावातून, नांदवणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे. तर दुसरा आहे जांभळी रोडने तुपेवाडी मार्गे.
वाळकी नदीच्या खोर्‍यातील असरे, रेनावळे वासोळे गावी वाईहून एस.टी. ने येता येते.

या दोन्ही गावातून पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंतीनंतर गडाच्या निकट पोहचता येते व साधारणतः दीड ते दोन तासांच्या चढणीनंतर तुम्ही गडावर येता. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदर्‍यांचा सुंदर मुलूख दृष्टिपथात येतो.

महाराष्ट्रातील बाकीच्या किल्ल्यावर आढळणारे प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला एक वाट जाते ती एका खोबणीतून तुम्हाला गडमाथ्यावर आणते. गडावर पाहण्यासारखी मोठी अशी ठिकाणे नाहीत फक्त एक कावेची देखणी विहीर आहे. वरती पोहचताच गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. या डोंगररांगेला नवरानवरी चे डोंगर म्हणतात.

थोडं पुढे गेल्यावर जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायर्‍याही आहेत. हिला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात. या ५० - ५५ खोलखोल पायर्‍या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. या विहिरीत जाताना आजूबाजूच्या वातावरणातील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.

गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथर्‍यांचे अवशेष दिसतात.

नैर्ऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोबत कमळगडाला मिळाली आहे. गडाला भेट देताना धोमचे हेमाडपंती शिवमंदिर जरूर पाहावे, खूपच प्रेक्षणीय आहे. हे मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.

वाईपासून वाटेतच मेनवलीचा प्रसिद्ध घाट लागतो. भारतीय चित्रपट सृष्टीत बऱ्याच चित्रपटात (गंगाजल, स्वदेश) या घाटाचे चित्रण केले आहे. इथंच शेजारी नाना फडणवीस यांचा ऐतिहासिक वाडाही आहे. जवळच मराठी कवी वामन पंडित यांची भोमगावाला समाधी आहे.

कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.

√ गडावर जाताना कचरा करू नका..गडाचे पावित्र्य राखा..!

√ कोणत्याही गडावर गेल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या आणि बॉटल्स इकडेतिकडे टाकू नका..!

√ सोबत नेलेले सर्व साहित्य सोबत घेऊन परत जा.

√ गडावर मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा, गडाच्या परिसरात वन्यजीव असतात त्यामुळे त्यांचे आधिवास अबाधित ठेवा.

√ गडाच्या परिसरातील वन्यजीवांचा माणसाला व माणसाचा वन्यजीवला धोका होऊ शकतो त्यामुळे त्यांच्यापासून लांब राहा.

√ गडकिल्ले फिरताना शक्यतो कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त पंधरा लोकांचा ग्रुप बनवा, त्यापेक्षा जास्त लोकं नसावीत, शिवाय शनिवार रविवार सोडून गडकोट भटकंतीला जा.

√ गडावर आपल्या सोबत गडाचा व वन्यजीवांची चांगली माहिती असणारा माणूस हवाच.

√ गडावर पावसाळ्यात निसरडे होते, गडाचे दगड सुटतात तरी फोटोसाठी अति हौशी पणा करून गडाच्या कडेला जाऊ नका, धोका होऊ शकतो.

√ आपले किल्ले गडकोट आणि आपल्या भागातील सुंदर ठिकाणं ही सुंदर राहिलीच पाहिजेत हे आपलं कर्तव्य आहे, त्यांचे पावित्र्य राखूनच पर्यटन करा..

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर. / Laxmi Vilas palace, Kolhapur


लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर.

©Umakant chavan.

कृपया "लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर" आणि "लक्ष्मीविलास पॅलेस" बडोदा यांच्यात गफलत करू नये.

तो लक्ष्मी विलास पॅलेस हा गुजरातच्या वडोदरा शहरातील एक आलिशान राजवाडा आहे. हा राजवाडा बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव ह्यांनी १८९० साली १.८ लाख पाउंड इतक्या खर्चामध्ये बांधला. तिसरे सयाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीत बडोद्याचे संस्थान वैभवसंपन्न केले. त्यांनी आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मैदाने, कारंजी, रुंद रस्ते तयार करून बडोदा शहर सुशोभित केले. त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये 'लक्ष्मीविलास पॅलेस' या राजवाड्याच्या वास्तूचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.

तर महाराष्ट्रात लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर हे कोल्हापूर मधील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या यादीत असलेले छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. कोल्हापूर शहरापासून उत्तरेला बावड्याला जाताना शहरापासून पाच किलोमीटरवर ही देखणी वास्तू आपणास पाहायला मिळते.

लक्ष्मीविलास पॅलेस चे स्थान कोल्हापूरच्या इतिहासात खूप महत्त्वाच आहे. २६ जून १८७४ साली कागलच्या घाडगे घराण्यात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी म्हणजेच सण १८८४ मध्ये कोल्हापूरच्या छत्रपती राजे घराण्यात त्यांना दत्तक देण्यात आले. सन १८९४ मध्ये कोल्हापूरच्या गादीवर राजश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला.

छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून जगभरात त्यांचे कार्य गौरवले गेलेले आहे. शेती, सिंचन, पाणी व्यवस्थापण, अभियांत्रिकी शैक्षणिक विकास, कुस्ती खेळ कला व संगीत या सर्व क्षेत्रात त्यांनी मातब्बर असणाऱ्या त
लोकांचा त्यांनी कायम सत्कार व गौरव केलेला आहे. कला क्रीडा प्रकाराला त्यांनी कायमच राजाश्रय दिलाच, परंतु अभियांत्रिकी आणि शेतीप्रधान देशासाठी त्यांनी प्रचंड भरघोस कार्य केले.

राधानगरीचा लक्ष्मी सागर जलाशय देखील त्यांनी बांधलेली एक अप्रतिम वास्तू आजही कोल्हापूरकरांना पाण्याची सुबत्ता मिळवून देते. मागासवर्गीय दुर्बल घटकांचा विकास आणि सर्व धर्माच्या सामाजिक विकासासाठी त्यांनी भरघोस कार्य केले.

राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

सध्यस्थितीत महाराजांच्या या जन्मस्थानाचे रिनोव्हेशनचे काम पूर्ण होत आले आहे. इथं प्रसिद्ध राधानगरी धरणाची प्रतिकृतीदेखील बांधली गेली आहे ज्यावर आपणास प्रत्यक्ष जाता येते. भारतीय पुरातत्व विभाग यांच्या विद्यमाने इथे महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग व विविध घटना यांचे चित्रण करून त्याचे सुंदर संग्रहालय करण्याचे ठरवले आहे. हे संग्रहालय झाल्यानंतर कोल्हापुर च्या सौंदर्याला अजून झळाळी येईल यात शंकाच नाही...

टीप : कृपया स्थानिक पर्यटकांनी गर्दी करू नये. बाहेरच्या पर्यटकांना प्राथमिकता द्यावी,(अतिथी देवो भव: मधून आपली संस्कृती दिसते) पॅलेस आपल्या जवळ असलेने कधीही सहज पाहता येतो.

कृपया या परिसरात कचरा करू नये, प्लास्टिक पिशव्या इतरत्र टाकू नयेत, सेल्फीसाठी धरणावर गर्दी करू नये,  ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य राखा..

पॅलेस शेजारी असलेल्या विरगळी, शिळा या प्राचीन आहेत, त्यांना हात लावू नये, पुरातन असल्या कारणाने त्यांना तडे जाण्याची शक्यता आहे, त्या दगडावर चढू नये.

सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत लक्ष्मीविलास पॅलेस पाहता येतो.

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.
© Umakant chavan 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर / Shivaji University kolhapur.


शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

©Umakant Chavan

१९६२ रोजी कोल्हापूरच्या दक्षिणेला स्थापित झालेल्या शिवाजी युनिव्हर्सिटीला सध्या भारतात मानाचे स्थान आहे. सार्वभौम स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेले हे विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना मिळालेला शिक्षणाचा खजिनाच होय.

शिवाजी युनिव्हर्सिटी चे कॅम्पस ८५३ एकर मध्ये पसरलेले आहे. विद्यापीठाचे उद्घाटन १८ नोव्हेंबर १९६२ रोजी भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री नामदार यशवंतराव चव्हाण व बाळासाहेब देसाई यांनी या विद्यापीठाच्या स्थापनेत खूप मोलाची कामगिरी बजावली.

विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला (इ.स. २००४). त्यामुळे आता कोल्हापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीठापैकी एक आहे.

कोल्हापूर सांगली सातारा यामधील जवळजवळ २८०  कॉलेजेस शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत कार्य करतात. "ज्ञानमेवामृतम" हे विद्यापीठाचे  ब्रीदवाक्य आहे.

विद्यापीठाने सध्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर यांच्यासोबत मटेरियल सायन्स वर काम करायला सुरुवात केलेली आहे, याव्यतिरिक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेशियम मुंबई व इतर अनेक मोठमोठ्या देश विदेशातील संस्थांसोबत विद्यापीठाचे कार्य चालते.

सध्य स्थितीला जवळ जवळ अडीच लाख विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. विद्यापीठाला शिक्षण गुणोत्तराचे मॅकचे "ए" ग्रेडचे मानांकन मिळाले आहे.

भारतातील नामांकित अशा पन्नास विद्यापीठांपैकी एक नावाजलेले विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाची ख्याती आहे, विद्यापीठ हे नॅशनल लेव्हल ला ४४ व्या क्रमांकात आहे.

विद्यापीठाची बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर लायब्ररी ही एक महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लायब्ररी पैकी एक आहे. विद्यार्थ्यांच्या फक्त शैक्षणिक पुस्तकांची पैकी विविध पुस्तकांची रेलचेल या ग्रंथालयात आहेच परंतु अभ्यासाव्यतिरिक्त साधारणता या ग्रंथालयात तीन लाखांपेक्षा जास्त अशी ग्रंथसंपदा आहे.

विद्यापीठाचा कॅम्पस अतिशय सुंदर असून विद्यापीठात प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळे केलेले आहे. विद्यापीठाच्या आवारात दोन तलाव असून आजूबाजूला खेळण्यासाठी मैदाने देखील आहेत. याव्यतिरिक्त मोठे ऑडिटोरियम, तीन कॅन्टीन आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता वसतिगृहाची देखील सोय आहे.

विद्यापीठाचा परिसर प्रशस्त असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सोई करता विद्यापीठ अनुकूल आहे. शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील देखण्या विद्यापीठांपैकी एक आहे, विद्यापीठ मध्ये बॉटनी डिपारमेंट, पर्यावरण शास्त्र विभाग, कला, क्रीडा, जर्नालिझम, झूलॉजी, बायोलॉजी, शास्त्र, भूगोल, फुड सायन्स, केमिस्ट्री, टेक्नॉलॉजी, एम बी ए, सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स, हिस्टरी, इकोनॉमिक्स, मराठी हिंदी व विदेशी भाषांचा देखील समावेश आहे.

विद्यापीठाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपले लक्ष वेधून घेतो. विद्यापीठाचा परिसर अतिशय सुंदर आणि शांत आहे. शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूर शहरातील एक देखणे ठिकाण प्रत्येकाने एकदा पहावे असेच आहे..

©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.
९६५७७४४२८३.

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...