Wednesday 26 June 2019

पैसा झाला मोठा...! By Umakant Chavan

पैसा झाला मोठा..! By Umakant chavan

©उमाकांत चव्हाण..

काल एका ग्रुप मध्ये हरिहर किल्ल्याचे काही फोटो आले. जवळपास दीडशे ते दोनशे लोकांची जत्रा या किल्ल्यावर वेगवेगळ्या संस्थांनी आणली होती.

मी स्वतः ट्रेकर आहे, त्यामुळे किल्ल्याबद्दलचं प्रेम मला चांगलंच माहित आहे. पण दोनशे ते अडीचशे लोक एका वेळेस एखाद्या किल्ल्यावर...? ते देखील हरिहर सारख्या किल्ल्यावर नेणं हे कितपत योग्य आहे ? यावर प्रश्नचिन्ह उभे राहते..

खरंतर बऱ्याच वेळेस आपण बघतो की किल्ले भ्रमंती, गडकोट फिरणे आणि ट्रेकिंग या गोष्टी आता घराघरात पोहोचलेल्या आहेत. पूर्वी ट्रेकिंग करणे किंवा किल्ले फिरणे या गोष्टी ठराविक लिमिटेड समाजापुरतेच मर्यादित राहिले होते. एक तर असे ट्रेक करणारा श्रीमंत वर्ग असायचा किंवा भटके लोक असे ट्रेकिंग करायचे. याव्यतिरिक्त एक वेगळा ग्रुप होता जो म्हणजे "शिवप्रेमींचा" ! ज्यांच्या मनात किल्ल्याबद्दल अतिशय निकटता असायची ते लोक हे गड-किल्ले अक्षरशः वेड्यासारखे फिरायचे... पण आता तुम्ही ट्रेकिंग करत आहे म्हणजे तुमचा "स्टेटस सिम्बॉल" झालेला आहे, म्हणूनच कित्येक शेकडो तरुण-तरुणी, वयस्कर व्यक्ती आज-काल ट्रेकिंगला जातात...

ट्रेकिंग करणे हे अतिशय चांगलंच आहे. यात कुठलाही वाद नाही, पण ट्रेकिंगला जाताना योग्य त्या गोष्टींची काळजी घेणे, हे देखील तितकंच खरं आहे.. उदाहरणार्थ आपण ज्या किल्ल्यावर जातो किंवा ज्या जंगलात जातोय, त्या जंगलाबद्दल परिपूर्ण माहिती असणारा एक गाईड आपल्यासोबत निश्चितच हवा...

दुसरं म्हणजे आपण पण ज्या भागात जाणार आहे तिथे जाताना तिथला हवामान, तिथली नैसर्गिक संसाधने, तिथली बायोडायवर्सिटी, तिथं असणारे वेगवेगळे वन्यजीव, पुढे फ्युचर मध्ये येण्याजाण्याचे रस्ते, या सगळ्या गोष्टींची देखील तितकीच माहिती हवी....त्याव्यतिरिक्त ट्रेकिंगला जाताना एक ग्रुप जास्तीत जास्त आठ ते दहा लोकांचा असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. (ट्रिप वेगळी) जर तुम्हाला शंभर-दीडशे लोकांना घेऊन जायचं असेल तर अशा ठिकाणी ट्रेकिंगला गेलेले चांगले की, जिथे काहीही अपाय होणार नाही किंवा त्या लोकांना सहज नेता येईल व सहज आणता येईल...

हरिहर सारख्या किल्ल्यावर दीडशे-दोनशे लोक घेऊन जाणे किंवा कलावंतीन दुर्ग दोनशे जणांना घेऊन चढणे म्हणजे अक्षरशः मूर्खपणा आहे असे मला वाटते... कारण की या किल्ल्यांची जी धार आहे आणि जो चढ आहे तो अतिशय तीव्रतेचा आहे शिवाय या किल्ल्यावरून तोल गेला तर निश्चितच मोठा अपघात होण्याची चान्सेस जास्त आहेत, अशा किल्ल्यांवर आठ दहा जण घेऊन जाणून सुद्धा खूप मोठी रिस्क आहे त्या किल्ल्यांवर काही ग्रुप आणि होशी पर्यटन मंडळी जी माणसं उत्साहाने भरलेल्या मुंबई-पुण्यात दोनशे लोक घेऊन हरिहर सारख्या किंवा कलावंतीन सारख्या किल्ल्यांवर जातात... त्या लोकांना फक्त एकच सांगणे आहे किल्ले संरक्षित ठेवा... ते देशाचं सौंदर्य आहे..

किल्ले आणि असे जंगलातले ट्रेक्स खूप गरजेचे आहेत कारण की तुम्हाला तिथे गेल्यानंतर आत्मिक ऊर्जा मिळते, मन हलक होतं. पण त्या ठिकाणी तुम्ही जर कमर्शियलायझेशन केले तर निश्चितच या भारतात शांत राहण्यासाठी एक देखील ठिकाण मिळणार नाही. सध्या माऊंट एव्हरेस्ट ची जत्रा भरते ती पाहिलीच की..! महाराष्ट्रात कळसुबाई, हरिहर किल्ला, कलावंतीण दुर्ग, नाणेघाट, जीवधन, कर्नाळा, सिंहगड, तोरणा, राजगड, रायगड आणि लिंगाणा या किल्ल्यांवर आजकाल ज्या जत्रा भरत आहेत त्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं, कारण की एकतर हे किल्ले खूप दुर्गम होते. "दुर्गम तोच दुर्ग, रस्ते करणे म्हणजे किल्ल्याच्या दुर्गामतेला सुरुंग लावणे".. तिथे जाताना माणूस चार वेळा विचार करत होता. शिवाय या किल्ल्यांची जी दुर्गमता होती ती अवर्णनीय होती...पण आता जस ताडोबाच्या वाघाचं मांजरं झालीत तसं या किल्ल्यांचा कचरा केलेला आहे आणि हे पाहून खरंच मनात इतका प्रचंड राग येतो...

यावर कधीतरी बोलावसं वाटतं कारण की हे किल्ले म्हणजे एक पवित्र ठिकाण होती. तिथं आता सध्या कुरकुरे, प्लास्टिकच्या पिशव्या, काही किल्ल्यांवर दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे बॉटल्स आणि प्रचंड कचरा पडलेला असतो...!

आता प्रश्न राहिला हा कचरा उचलायचा कोणी ? तर हा कचरा आणि ही किल्ले गडकोट साफ करण्यासाठी बरेच ट्रेकर मंडळी देखील हातभार लावतात. खूपशी मंडळं मला माहिती आहेत किंवा बरेच लोक मला माहिती आहेत की जे लोक दर महिन्याला जाऊन किल्ले साफ करत आहेत...

माझा स्वतःचा ग्रुप सुद्धा बऱ्याच वेळा स्वच्छ तेच मोहिमेसाठी जातो, पण मला या सगळ्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो (माझ्या स्वतःच्या ग्रुप बद्दल देखील हेच माझं मत आहे) की का आपण किल्ले स्वच्छ करायचे ?

"माझा किल्ल्या स्वच्छ करण्याला विरोध नाहीये, माझा किल्ला घाण करण्याला विरोध आहे".. रोग झाल्यानंतर औषध देऊ नका... रोग होऊनच देऊ नका..!त्याच्यासाठी योग्य ती काळजी घ्या. किल्ल्यावर घाण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट कळाली पाहिजे की आपले किल्ले म्हणजे आपली "राष्ट्रीय धरोहर" आहेत ते जर तुम्ही घाण केलेत तर निश्‍चितच तुमची भावी पिढी तुम्हाला शिव्याच घालणार....

दुसरी गोष्ट म्हणजे किल्ल्यांवर आजकाल होणारे इव्हेंट... ! किल्ल्यावर ज्या वेळी २०० पब्लिक राहायला जातं त्यावेळेस त्या किल्ल्या शहर स्वच्छतेचा प्रश्न उभा राहतो २०० लोकांना प्रातविधी करण्यासाठी जी जागा लागते त्या जागेवर अक्षरशः कुजलेल्या कचर्यासारखा वास येतो. म्हणजे तुम्ही किल्ला घाण करत आहे, हे देखील लक्षात ठेवा !

एक किल्ला पाहताना आपण एक इतिहास जगत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा..!

आज-काल पर्यटन नावाचं भूत महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या मंडळींच्या मानगुटीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात बसलेलं आहे.

माझा पर्यटनाला विरोध नाहीये किंबहुना मी स्वतः ते खूप फिरतो, पर्यटन देखील करतो, मला फिरायला आवडतं पण याचा अर्थ असा नाही की दर शनिवारी-रविवारी मित्र मंडळ यांनी फॅमिली घेऊन बाहेर गेलेच पाहिजे...

वेळ घरात जात नाही असंही नसत, फॅमीली सोबत असताना एकत्र राहू शकता... मग कुठलेही ठिकाण असो. पण आज-काल नाणेघाट, हरिशचंद्र, रतनगड, कळसुबाई, जीवधन, माळशेज, कलावंतीण, राजमाची, ताम्हिणी, वरंधा, प्रतापगड, वासोटा, कोयना, आंबा, आंबोली, राधानगरी यासारख्या ठिकाणी पर्यटकांची इतकी गर्दी झालेली असते की असं वाटतं की महाराष्ट्रातले सगळे पर्यटक याच घाटात येऊन बसलेत..

कधीकधी वाटतं महाराष्ट्र रिकामा पडलाय प्रत्येक शनिवारी-रविवारी..! चुकून एखादा अपघात झाला तर सगळे इमरजेन्सी सर्व्हिसवाले ट्रेकला किव्हा फिरायला..!

लोकं म्हणतात, शेतकरी आत्महत्या करतात, देश गरीब झालय, पैसा नाही, नोटबंदी झाली, धंदा नाहीये, नोकऱ्या नाहीत, मग भरमसाठ किमतीचे कॅमेरे आणि इतकं ओव्हरलोड पर्यटन व चंगळवाद कसा काय उभा झालाय ? पैसा नाही कुठे ?

दर शनिवारी-रविवारी माणसं हॉटेलमध्ये जेवायला जातात.. एका ताटाचे बिल दोनशे रुपये असतेच.. पाच माणसे धरली तर हजार रुपये खर्च होतात... फक्त एका वेळेच्या जेवणावर चार आठवडे जर पकडले तर चार हजार रुपये...? एका फॅमिलीचा फक्त बाहेरच्या जेवणाचा खर्च...?

जे जेवण तुम्ही घरात करू शकता, तरीदेखील तुम्ही बाहेर जात आहे, म्हणजेच पैसा आहे आपल्याकडे ! तुम्ही पैसे खर्च करतात... भ्रमंती आणि पर्यटन ही वेगळी गोष्ट आहे आणि समाजाला दाखवण्यासाठी केलेली "एन्जॉयमेंट" ही वेगळी गोष्ट आहे...!

या दोन गोष्टी खूप मोठी तफावत आहे, या दोन गोष्टी कधीही एकत्र करू नका.. पर्यटन निश्चित करावं, बाहेर जेवायला जा, फिरा, एन्जॉय करा पण त्याला लिमिटेशन्स असाव्यात...

निसर्ग खूप मोठा आहे, हे सगळं अति झाल्यावर कधी ना कधी सर्वांनी तो बाऊन्स करणार,  आणि हे निश्चितच होणार आहे. प्रत्येक गोष्टीची एक कॅपॅसिटी असते.

गेल्या शनिवारी रविवारी आंबोलीत हजार माणसं... जवळजवळ तीनशे चारशे फोटोग्राफर रात्रीचे बेडूक शूट करत होती, काय चाललय काय ? आणि काय करताय ? लोकांना फक्त फेसबुक व्हाट्सअप वर दाखवण्यासाठी त्याचा उपयोग काय होतो ! (माहिती कुठे आहे ? ना त्यांच्या रक्षणार्थ काही भरीव काम होतेय ?) या गोष्टी देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे...(स्थानिक पर्यटन आणि रोजगार होतो ही चांगली गोष्ट आहे पण निसर्गाची काय अवस्था ? आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ना ? मग जे सुंदर आहे ते पाहायचं का, आहे म्हणून कितीही कसही वापरायचं ?)

माणसांच्या चैनीखोर वृत्ती वाढलेली आहे आणि त्याचा फटका निसर्गाला बसत आहे... मग तो कुठल्याही प्रमाणात असो... दर शनिवारी-रविवारी सगळे धबधबे ओव्हरलोड होतात, इतक पब्लिक असतं की शांति आणि निसर्गाची एकाग्रता कुठलेही धबधब्यात पाहायला मिळत नाही...

एक वेळ होती जेव्हा धबधब्याचा नाद एकटा शांत ऐकयचो... तिथं विलासी आणि चैनीखर वृत्ती पण वाढ झालेली आहे आणि चंगळवादी पर्यटन चालू आहे. त्या पर्यटनाचा फटका कधी ना कधी निश्चितच महाराष्ट्राला खूप मोठा भोगावा लागणार आहे, कारण की निसर्ग जितकं देतो त्याच्यापेक्षा कितीतरी पट घेतो..! ही गोष्ट कायम लक्षात ठेवा..! शिवाय असल्या अघोरी आणि चंगळवादी पर्यटनामुळे निसर्गाचा प्रचंड प्रमाणात ह्रास होतो आहे, ती जबाबदारी देखील आपण टाळत आहे !

गरज आहे का इतकं सगळं करण्याची ? याआधी देखील आपण आनंदी होतोच की, गल्लीतले खेळ, मित्रांसोबत गप्पा विसरलो का आपण ? शेवटी आता पैसा झाला मोठा..!

एकदा या गोष्टीवर विचार जरूर करा...!

©उमाकांत चव्हाण,
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

 photo fb kadun sabhar








किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...