Tuesday 28 February 2023

किल्ले सज्जनगड


जिल्हा - सातारा


प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग पूर्वेकडे जाते या रांगेला शंभूमहादेव या नावाने ऒळखतात. या रांगेला तीन फाटे फुटलेले आहेत. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी.

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किमी अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोर्‍यात हा दुर्ग उभा आहे.
इतिहास :
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ’आश्वालायनगड’ म्हणू लागले. या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते, म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधले जात असे. चवथा बहमनी राजा महंमदशहा (१३५८ - १३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून धेतला.

शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले "सज्जनगङ". राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. दिनांक ३/११/१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले, पण ३/१२/१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तींची गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २/६/१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोती काटकर हयाला पत्र लिहले की, 
‘‘श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती. ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात, तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून कळो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये? या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा करणे. वेदमूर्ती बिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे. तो होईलया उपरी घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे या पत्रा प्रमाणे राहाटी करणे’’.

या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ’नौरसतारा’ म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

No comments:

Post a Comment

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...