Wednesday 27 March 2019

म्हशींचे पाणी आणि धगधगती आग !!




पेठवडगाव मधून रात्रीचे दहा वाजता कोल्हापूर कडे येत होतो, वाटेत एका ठिकाणी एक झाड जळताना दिसले मजबुतीने उभे असलेले हे झाड खोडातून जळत होते. का कुणास ठाऊक बघवलं नाही आणि गाडी बाजूला घेतली. बॅगमधील पाण्याची बाटली काढली आणि उरलंसुरलं पाणी त्या जळत्या झाडाच्या खोडावर टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, चर्रर्र आवाज आला आणि निखार्‍यावर पाणी मारावे आणि निखारे शांत व्हावेत आणि असं काहीतरी झालं.

विचार केला, हे जर असं ठेवलं तर हे झाड संपूर्ण जळून पडेल. इकडे तिकडे पाहिलं, पण आजूबाजूला पाणी नव्हतं. पुढे थोड्या अंतरावर एक घर दिसले. गाडीला स्टार्टर मारला आणि तिथे गेलो. घराच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. 

समोर म्हशींना धुण्यासाठी आणि पिण्यासाठी केलेल्या हौदात थोडे पाणी दिसलं आणि हिरवळ झालेला पाण्यात पिण्याची पाण्याची बाटली  बुडवली बाटली भरून पाणी घेतलं.

पाणी घेऊन तसाच पुन्हा झाडाजवळ मागे आलो, झाडाच्या आग लागलेल्या भागावर पाणी मारण्याचा प्रयत्न केला, झाडाची उंची थोडी जास्त असल्यामुळे पाणी नीट मारता नाही आलं, खुपसं वाया गेलं, शिवाय झाडाच्या आजूबाजूला आग लागली होती नि जळत होते, त्याच्यामुळे झाडाजवळ जाता येईना. बरच पाणी वाया गेलं पण झाडाचे पेटलेलं खोड काही विझल नाही. 

जवळ एखाद पसरट भांडे असतं तर पद्धतशीरपणे त्या जळणाऱ्या खोडावर पाणी मारता आले असते, पण जमलं नाही शेवटी एक डोक्यात विचार आला तसंच हिरवे शेवाळलेले पाणी तोंडात भरुन घेतले आणि तोंडाची पिचकारी लांबूनच त्या झाडावर मारली. 

बरोबर नेम लागला आणि जे होतं ते सर्व पाणी असं करत करत दहा-बारा पिचकाऱ्या नंतर बऱ्यापैकी झाडात आणि झाडात खोडातील लागलेली आग बर्‍यापैकी कंट्रोल झाली. पण अजून थोडस धुपत होतं जिथपर्यंत मला पाणी मारता येत नव्हतं, पुन्हा परत त्या घराजवळ गेलो पून्हा ते शेवाळलेले पाणी घेऊन झाडाजवळ आलो मनात त्या *म्हशीला नमस्कार केला* आणि पुन्हा तोंडात घेऊन ते पाणी चूळ भरल्या सारखे त्या झाडाच्या खोडावर पिचकारी च्या स्वरूपात मारलं.

असो, ही काही खूप मोठी गोष्ट नव्हती पण मुद्दा हा होता की या झाडांना  ही आग लावली कोणी ? असं कोणीही उठतय आणि आग वणवे लावत सुटतेय ? आजकाल जंगल आणि आजूबाजूला काड्या लावून काही लोकं आग लावत आहेत.

हे कुठेतरी थांबले पाहिजे लोकांनाही कळत नाहीये की, वन्यजीव संपत्ती आपल्यासाठीच आहे, रस्ते विकास प्रकल्पासाठी ही झाडे तोडण्याची पद्धतशीर अवलंबलेली पद्धती आहे हे मला माहिती आहे. पण अशी झाडं तोडून कधीही शाश्वत विकास होणार नाहीये, याकरिता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

माझी पेटवडगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना नम्रतेची विनंती आहे की, तुमच्या आजूबाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी झाड आहेत ही तुमच्या भागातील खरी संपत्ती आहे याची जपणूक जितकी चांगली होईल तितकं तुमचं जीवन सुकर होईल यात वादच नाही.

तसही पेठ वडगाव च्या आजूबाजूच्या लोकांनी जैवविविधता खूप चांगल्या पद्धतीने जतन केलेली आहे.  पेठवडगाव मध्ये माझे काही निसर्गप्रेमी मित्र आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने वन्यजीव संपदा जपण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

आपण अशी लागलेले वनवे किंवा आग यांची काळजी घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करावा व आपल्या परिसरातील झाडे आणि वृक्ष जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे मला वाटते.

©उमाकांत चव्हाण,
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.
९६५७७४४२८३.

No comments:

Post a Comment

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...