Wednesday, 12 October 2022

तू माझा आहेस फक्त माझा...!

तसं सह्याद्रीच अन माझं नातं खूपच जुनं.. अगदी कळत नसल्यापासून त्याच्या अंग खांद्यावर खेळलोय.. आजही तसाच खेळतोय म्हणा... परंतु सध्या त्याचं सौंदर्य फक्त बघत बसतो.. कधी वाटलंच.. तर कॅमेऱ्याने टिपायचं, नाही तर फक्त डोळ्यांमध्ये भरभरून घ्यायचं.

किती देखणा पर्वत आहे हा... राजबिंडा आणि रुबाबदार... अगदी मर्दानी आखाड्यात कसलेल्या मल्लासारखा...

"कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा" ही बिरूदे मिरवणारा हा जनरल सह्याद्री खरच खूप देखना आहे मित्रांनो..

परंतु सद्यस्थितीला या सह्याद्री पर्वताचे कपडे ओरबडून काढत आहेत लोक... डोंगर माथे बोडके केले, भरगच्च भरलेली हिरवी झाडे तोडली आणि सह्याद्रीला उघडा केलाय लोकांनी...

जो सह्याद्री अथांग अरबी समुद्राला दख्खनच्या पठारावर येण्यापासून रोखून धरतो, त्या सह्याद्रीची लक्तरे काढली आहेत आपण...?

असो खोलवर जाणार नाही, परंतु गेले कित्येक वर्ष (महाराष्ट्रातील) (कर्नाटकातील मलबार पाहताना अक्षरशः वेड लागते बर का.. लवकरच पाहायला मिळेल तुम्हाला यूट्यूब च्या माध्यमातून..) या सह्याद्रीच रौद्र राकट पण तितकच सुंदर रूप मला पाहायला मिळालं नव्हतं.

योगायोगानं काल तो दिवस उजाडला आणि त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जाऊन स्वतःला हरवून बसलो. कारण तसं काही मोठं नव्हतं... सहज फिरायला जायचं होतं, परंतु कालच्या ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच पाऊल टाकणार होतो. त्यामुळे उत्सुकता होती की इथून माझा हा "सखासह्याद्री" मला दिसतो कसा ?

पण खरंच सांगतो मित्रांनो काल जो नजारा मी पाहिलाय तो अक्षरशः वेड लावणार होता. विचार करा मी असं म्हणतोय, मी सह्याद्री उभा आडवा भटकलोय, चालत, सायकलवर, गाडीवर, फोर व्हीलरने, मिळेल त्या वाहनाने फिरलोय.. अक्षरशा चप्पा चप्पा पाठ झालाय, दोन-चार बोटावर मोजणारी ठिकाणी सोडली तर सह्याद्रीतले कडे कपारी, पुरातन घाट वाटा, असंख्य उत्तुंग किल्ले, अगदी घरच्या पायऱ्यांसारखे पाठ झालेत, परंतु अगदी मनापासून खरं सांगतो गेल्या आठ-दहा वर्षात सह्याद्रीच इतकं देखणं रूप मी खरंच पाहिलं नव्हतं इतका सुंदर मला काल तो दिसला... (मला प्रत्यक्ष ओळखणारे बरेच लोक मला जिप्सी म्हणतात आणि त्यांना माहितेय मी सह्याद्रीत कसा फिरतोय..)

माझ्यासमोर अथांग निळ्या पाण्याने भरलेला जलाशय, त्याच्या पलीकडे पायथ्यापासून कमरक्यापर्यंत भरगच्च उंच झाडी आणि कमरक्याच्या झाडी पासून वरती हिरवा गार असा सह्याद्री... मध्येच त्या हिरवेपणाला कातळाच्या काळया पट्ट्या मारलेल्या होत्या... विराट, बिकट आणि उत्तुंग...

अगदी माझ्या कवेत न मावणारा... प्रचंड डामडौल असणारा.. पाचूचा हिरवा कातळकडा आणि समोर भरगच्च उंचीने मला रोखून कंबरेवर हाथ ठेऊन उभा राहिलेला विठ्ठलच जणू... आसा हा सह्याद्री मला या आधी कधीच नाही दिसला... मला तो कायम गर्द निळा काळा राम, कृष्ण महादेवच दिसला होता, आजही सावळा विठ्ठलच पण आज हात पसरून माझी वाट आडवली होती असा वाटत होता..

अक्षरशा मान ज्या बाजूला वळेल तिथपर्यंत फक्त आणि फक्त हा जनरल सह्याद्री, मला माझ्या कुशीत घेऊन कसा आहेस म्हणून विचारत होता..?

साधारणता आठ नऊ वर्षांपूर्वी या सह्याद्रीची एक पोस्ट टाकली होती, खूप व्हायरल झाली होती. एक छोटसं पत्र लिहिलं होतं त्याला... की मी तुझ्या प्रेमात आहे म्हणून...

काल देखील तसेच वाटलं, प्रेम तर जूनचं आहे, फक्त नव्याने झालं होतं आज... अगदी मनाच्या तळापासून...

या सह्याद्रीची असंख्य विविध रूपे मी दररोज अनुभवतोय, कित्येक गडकोट किल्ले भटकून झाले, (आकडा जवळजवळ २२० पार गेलाय) महाराष्ट्रातला जवळजवळ अर्धा सह्याद्री माझ्या PC मध्ये 'वरून ' कसा दिसतो ते शूट केला आहे. तुम्हाला हा  पाहायला मिळेलच पण उरलेला अर्धा लवकरच पूर्ण देखील होईल...

पण एक बोलू...? या सह्याद्रीच जे सौंदर्य आहे ते प्रत्येक दिवसाला निखरून येतं आणि त्याची एक झलक लवकरच तुम्हाला माझ्या काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.

तरीपण मित्रांनो एक सांगतो, काल जो सह्याद्री पाहिला तो खरच गेल्या आठ दहा वर्षात इतका सुंदर सह्याद्री मी अनुभवलाच नव्हता.. अंगात ताप असताना पण फिरणारा मी त्याचा वेडा..

असं वाटू लागलंय आज देखील पुन्हा एकदा तिथे जाऊन बसाव.. आणि हो... याच आठवड्यात पुन्हा तिथं चाललोय बर का... तसा मी खूप लकी आहे मन जिथं जातं तिथं मला जायला मिळतं.. l

मी स्वतःला कारणे देणे बंद केलं आहे...कारण वेळ देणे सुरू आहे...

© उमारण्यक 

No comments:

Post a Comment

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...