Tuesday, 28 February 2023

किल्ले बाणकोट / हिम्मतगड

 

बाणकोट / हिम्मतगड
जिल्हा - रत्नागिरी
महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या बाणकोट खाडी चे रक्षण करत बाणकोटचा किल्ला शतकानुशतक उभा आहे. बाणकोट खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे, ह्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर बाणकोटचा किल्ला बांधण्यात आला. बाणकोट किल्ल्यापासुन ३५ किमी अंतरावर असलेला मंडणगड किल्ला आणि द़ासगावची लेणी आजही या जून्या व्यापारी मार्गाची साक्ष देत उभी आहेत. अनेक राजवटी पाहिलेला बाणकोटचा किल्ला "हिम्मतगड " आणि " फोर्ट व्हिक्टोरीया" या नावांनीही ओळखाला जातो.
इतिहास :
बाणकोटच्या किल्ल्याचा सर्वात जूना उल्लेख ग्रीक प्रवासी प्लिनी ह्याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे. त्यानंतर इ.स. १५४८ पर्यंतचा या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. १५४८ साली हा किल्ला पोर्तुगिजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्हेजी आंग्रे यांनी हा गड काबिज करून त्यास "हिम्मतगड" असे नाव दिले. तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला. त्याने त्याला "फोर्ट व्हिक्टोरीया" नाव दिले. व्यापाराच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व बंदर फायदयाचे होत नव्हते, त्यामुळे इंग्रजांनी तो किल्ला पेशव्यांना परत केला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या पायथ्याशी गणपती मंदिर आहे. गडाला सर्व बाजुंनी जांभ्या दगडात खोदुन काढलेला खंदक आहे. गडाचा दरवाजा उत्तराभिमुख असुन सुंदर दगडी महिरपींनी सुशोभित केलेला आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवडया आहेत. उजव्या बाजूच्या देवडीत ६ पाण्याचे हौद आहेत. तिथुन पुढे गेल्यावर नगारखान्यात जाण्यासाठी डाव्या हाताला सुबक जीना आहे. त्यावरून वर गेल्यावर सावित्री नदी व सागराचा संगम आणि आजुबजुचा प्रदेश आपल्या दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पूर्व-पश्चिम बाजूस २ जीने आहेत. पश्चिमेकडील दरवाजाने तटाबाहेरील बुरूजावर जाता येते. हया बुरूजात खोल विहीर आहे ,ती आता बुजलेली आहे. पश्चिमेकडे बुरूजातच पहारेकर्‍यांसाठी खोली आहे. हया पाण्याच्या बुरूजात चोर दरवाजा आहे. बाणकोटहून वेळासकडे जाताना वाटेत "पाणबुरूज" किंवा मधला बूरूज लागतो. मुळ किल्ल्याला बळकटी आणण्यासाठी सिध्दीने हा बुरूज बांधला.

No comments:

Post a Comment

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...