लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर.
©Umakant chavan.
कृपया "लक्ष्मीविलास पॅलेस, कोल्हापूर" आणि "लक्ष्मीविलास पॅलेस" बडोदा यांच्यात गफलत करू नये.
तो लक्ष्मी विलास पॅलेस हा गुजरातच्या वडोदरा शहरातील एक आलिशान राजवाडा आहे. हा राजवाडा बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव ह्यांनी १८९० साली १.८ लाख पाउंड इतक्या खर्चामध्ये बांधला. तिसरे सयाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीत बडोद्याचे संस्थान वैभवसंपन्न केले. त्यांनी आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मैदाने, कारंजी, रुंद रस्ते तयार करून बडोदा शहर सुशोभित केले. त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये 'लक्ष्मीविलास पॅलेस' या राजवाड्याच्या वास्तूचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.
तर महाराष्ट्रात लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर हे कोल्हापूर मधील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या यादीत असलेले छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे. कोल्हापूर शहरापासून उत्तरेला बावड्याला जाताना शहरापासून पाच किलोमीटरवर ही देखणी वास्तू आपणास पाहायला मिळते.
लक्ष्मीविलास पॅलेस चे स्थान कोल्हापूरच्या इतिहासात खूप महत्त्वाच आहे. २६ जून १८७४ साली कागलच्या घाडगे घराण्यात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी म्हणजेच सण १८८४ मध्ये कोल्हापूरच्या छत्रपती राजे घराण्यात त्यांना दत्तक देण्यात आले. सन १८९४ मध्ये कोल्हापूरच्या गादीवर राजश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून जगभरात त्यांचे कार्य गौरवले गेलेले आहे. शेती, सिंचन, पाणी व्यवस्थापण, अभियांत्रिकी शैक्षणिक विकास, कुस्ती खेळ कला व संगीत या सर्व क्षेत्रात त्यांनी मातब्बर असणाऱ्या त
लोकांचा त्यांनी कायम सत्कार व गौरव केलेला आहे. कला क्रीडा प्रकाराला त्यांनी कायमच राजाश्रय दिलाच, परंतु अभियांत्रिकी आणि शेतीप्रधान देशासाठी त्यांनी प्रचंड भरघोस कार्य केले.
राधानगरीचा लक्ष्मी सागर जलाशय देखील त्यांनी बांधलेली एक अप्रतिम वास्तू आजही कोल्हापूरकरांना पाण्याची सुबत्ता मिळवून देते. मागासवर्गीय दुर्बल घटकांचा विकास आणि सर्व धर्माच्या सामाजिक विकासासाठी त्यांनी भरघोस कार्य केले.
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
सध्यस्थितीत महाराजांच्या या जन्मस्थानाचे रिनोव्हेशनचे काम पूर्ण होत आले आहे. इथं प्रसिद्ध राधानगरी धरणाची प्रतिकृतीदेखील बांधली गेली आहे ज्यावर आपणास प्रत्यक्ष जाता येते. भारतीय पुरातत्व विभाग यांच्या विद्यमाने इथे महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंग व विविध घटना यांचे चित्रण करून त्याचे सुंदर संग्रहालय करण्याचे ठरवले आहे. हे संग्रहालय झाल्यानंतर कोल्हापुर च्या सौंदर्याला अजून झळाळी येईल यात शंकाच नाही...
टीप : कृपया स्थानिक पर्यटकांनी गर्दी करू नये. बाहेरच्या पर्यटकांना प्राथमिकता द्यावी,(अतिथी देवो भव: मधून आपली संस्कृती दिसते) पॅलेस आपल्या जवळ असलेने कधीही सहज पाहता येतो.
कृपया या परिसरात कचरा करू नये, प्लास्टिक पिशव्या इतरत्र टाकू नयेत, सेल्फीसाठी धरणावर गर्दी करू नये, ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य राखा..
पॅलेस शेजारी असलेल्या विरगळी, शिळा या प्राचीन आहेत, त्यांना हात लावू नये, पुरातन असल्या कारणाने त्यांना तडे जाण्याची शक्यता आहे, त्या दगडावर चढू नये.
सकाळी १० ते सायंकाळी ५.३० पर्यंत लक्ष्मीविलास पॅलेस पाहता येतो.
©उमाकांत चव्हाण.
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.
© Umakant chavan
No comments:
Post a Comment