Wednesday, 27 March 2019

वणवा ! जबाबदारी कोणाची ? आपली का वनखात्याची ?

वणवा !!

दरवर्षी आपल्या जंगलांना वणवे लागतात, उन्हाळा सुरू झाला ही सर्व डोंगर की पिवळे पडलेले दिसतात, डोंगरावरचं गवत वाढलेलं असतं आणि कोणीतरी आगाऊ माणूस या गवतात सिगरेट्सचे थोटुक किंवा काडी टाकतो आणि मग हा सर्व डोंगर हा हा म्हणता क्षणभरात आगीचे रौद्र स्वरूप धारण करतो.

या डोंगरावर असणारी दुर्मिळ वन्यजीव संपदा, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, त्यांची अंडी ही सगळे क्षणभरात जळून खाक होते आणि मग उरतो तो फक्त धुर आणि गर्द काळी छाया..!!

कुठेतरी उडत असलेलं एक काळं कस्पट हळूच उडून तुमच्या अंगावर येतं आणि तुम्ही त्याला बाजूला टाकायला जाता तर त्याची काळी काजळी तुमच्या अंगावरील कपडे लागते आणि तुम्ही म्हणता, "अरे देवा ! हे काय झालं ?" पण त्या काळ्या कस्पटात हजारो वन्यजीवांचा आक्रोश तुम्हाला दिसत नाही हे दुर्दैव आहे.

तुम्ही टाकलेली एक काडी कित्त्येकांच आयुष्य जाळू शकते हे आपल्याला लक्षात येत नाही.

हे वनवे विझवायला वन खात्याकड पुरेसं मनुष्यबळ नाहीये, ना त्यांच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे. याचा अर्थ असा नाहीये की, हे लोक प्रयत्नच करत नाहीत. प्रयत्न तर त्यांचे चालूच असतात, पण आपल्या आजूबाजूच्या जंगलांच पेटणं आणि त्याचा वणवा इतका मोठा असतो की, एक अक्ख गाव जरी ते विझवायला गेलं तरी ते सहजासहजी विझणार नसत, कारण कोणाच्या तरी डोक्यात पेटलेली आग, ही क्षणभरात मना सकट माणूस जाळून काढते, आणि मग त्यामध्ये भस्मसात होतात असंख्य वन्यजीव..!!

काही अभ्यासकांच्या मते २००३ पासून २०१७ पर्यंत या काळात जंगलातील आगींचे प्रमाण हे ४५ टक्के वाढले आहे देशाचा विचार केल्यास उत्तराखंड येथे एकूण २२ ठिकाणी जंगलात वणवा पेटलेला आहे. गेल्या ८-१० आठवड्यात साधारणपणे १५०० ठिकाणी जंगलात आगीचे प्रकार झाले असल्याच्या बातम्या सुन्न करणाऱ्या आहेत. तामीळनाडू येथे लागलेल्या आगीत जीवितहानी झाल्याचे दुर्दैवी प्रकार घडले आहे. अभ्यासकांच्या मते नैसर्गिक वणव्यांना कारणीभूत ठरत असलेले मुख्य कारण आहे की, १९७१ पासून सातत्याने उष्ण लहरींचे वाढलेले प्रमाण आणि शीत लहरींचे कमी होत असलेले प्रमाण हा निसर्गातील असमतोल जंगलातील वणव्यांना निमित्त ठरतो आहे.

त्यामुळे देशपातळीवर जंगलात निर्माण झालेले शुष्क वातावरण हे या आगींच्या तीव्रतेला हातभार लावण्यास अधिक कारणीभूत ठरते आहे असे २०१३ सालच्या निसर्गतज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकोपातून अनेक पक्षी, त्यांची घरटी, सरपटणारे प्राणी यांची मोठय़ा प्रमाणात होणारी जीवितहानी हा मोठा चिंतेचा विषय आहे, शिवाय ज्या परिसरात आग लागते तिथली जमीन जैवविविधतेच्या दृष्टीने पुनर्स्थापित होण्यास बराच कालावधी जाऊ द्यावा लागल्याने एक प्रकारे जंगलांच्या विरळतेत अधिक भर घालणारा ठरतो.

या वनव्यांना परदेशात कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा आहेत. काही ठिकाणी तर जंगलांवर विमानातून पाणी सोडले जाते, आपल्याकडे अजून अशा यंत्रणा नाही. त्यामुळे अजूनही पारंपारिक पद्धतीने म्हणजेच झाडपाला घेऊन आग विझवण्याची पद्धत आहे, तीच अमलात आणली जाते.

काही ठिकाणी सध्या ब्लोवर नावाचं यंत्र आलेला आहे, पण हे कितपत आग विझवणार हा मोठा प्रश्न आहे..!! कारण जंगलाला लागलेली आग ही सामान्यता सात ते आठ फुटाची आगीची लाट निर्माण करते आणि उसळते त्यामुळे अशा आगीच्या आसपास जाऊन ती विजवणे म्हणजे भयंकर अवघड गोष्ट आहे.

कृपया आपल्या आजूबाजूला च्या जंगलाला जर आग लागली किंवा धूर निघत असेल, तर ताबडतोब वन खात्याला त्याची माहिती द्या आणि ती आग विझवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.

पर्यावरण संरक्षण म्हणजे नुसतं बोलणं किंवा नुसतं लिहिणं किंवा फक्त रंगपंचमीला पाणी वाचवणे न्हवे तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवून पर्यावरणीयदृष्ट्या त्या गोष्टींचं महत्त्व ओळखून निसर्गाच्या सोबत चांगलं जगणं, म्हणजेच पर्यावरण संरक्षण होय...!!

अवेअरनेस प्रोग्रॅम घेणे जास्त गरजेचे आहे, तसेच सध्या असलेल्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करणेदेखील तेवढेच गरजेचे आहे, असं मला वाटतं..!!

त्यामुळे आग जर लागत असेल तर ती विझण्याचं तंत्रज्ञान जसे डिझास्टर मॅनेजमेंट करत असते तशीच काहीशी सोय प्रत्येक गावात झाली पाहिजे, म्हणजे प्रत्येक गावात नैसर्गिक आपत्तीपासून गावाला कसे वाचवायचे आणि एखादा वन्यजीव जंगल सोडून गावाच्या हद्दीत आला तर त्याला सुरक्षित पकडून जंगलात कसे सोडायचे यांची एक समिती त्या ग्रामपंचायतीने त्या गावात नेमली पाहिजे, या समितीवर (संस्थेवर) वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक हे सल्लागार म्हणून असावेत आणि प्रत्यक्ष गावातील तरुण मंडळातील काही कार्यकर्ते या समितीत सदस्य असावेत, यांच्याकडून हे निसर्गरक्षणाची काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल..!

©उमाकांत चव्हाण.
9657744283 #umakantchavan

No comments:

Post a Comment

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...