Wednesday, 12 October 2022

माझं हक्काचं जंगल...!

माझं जंगल... दररोज नवं भासणारं.. अगदीच अनोळखी नाही... परंतु प्रत्येक पावलावर शिशिर ऋतुच्या पानगळती पासून चैत्राच्या सुंदर पालवीपर्यंत असंख्य रंग, असंख्य सुगंध आणि नवचैतन्य भरून ओंजळीतून माझ्या दारात घेऊन येणारं... माझं जंगल... मला आजही थोडं नवंच वाटलं...

जंगलाच्या अनोळखी पायवाटा, इथले भले मोठाले दगड, मातीचा तो मंद सुगंध, खळखळत वाहणारे छोटे ओढे, त्याच्या वाहणाऱ्या पाण्याचा तो नाद... वाऱ्याच्या झुळुकीबरोबर अलगद आपल्या आई-वडिलांचा हात सोडून वाऱ्यावर स्वार होणार एखादं उडणारे पान आणि मग मध्येच एखाद्या छोट्याशा फांदीवर बसून उगाचच शांत स्तब्ध असलेल्या या जंगलाला स्वतःच्या मंजुळ आवाजाने झोपेतून उठवणारे रानपक्षी... असे कित्येक नजारे या जंगलात दररोज पाहायला मिळतात मला...

कधी कधी असं देखील वाटतं की या जंगलाने मला कवेत घेतलं आहे, कारण की बऱ्याचदा इथे मला "मी" सापडतो... 

अगदी मातीवर पडलेली सूर्याची किरणे देखील कित्येक वर्षानंतर त्याच ठिकाणी त्या मातीला बिलगताना दिसतात, परंतु आज ती सर्व किरणे एका झाडामागून हळूच डोकावून पाहत होती. बहुदा माझ्याकडेच पाहत असतील, कारण बऱ्याच वर्षानंतर मी त्या दिव्य भास्कराला एकांतात भेटत होतो. एरवी तो मला सिमेंटच्या जंगलातून वर येताना आणि सिमेंटच्या जंगलातच विरघळताना दिसतो...पण आज त्याचं देखणं रूप काही वेगळंच होतं...

© उमारण्यक...

No comments:

Post a Comment

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...