Tuesday, 28 February 2023

किल्ले जीवधन

 

जिल्हा -पुणे
घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता.
इतिहास :
शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती, १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ’मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणार्‍या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्व:त… वजीर बनले. गाव गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे
पहाण्याची ठिकाणे :
गडाचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे गावकरी याला ’कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१ कल्याण - नगर मार्गे :-
कल्याण - नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात, हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे लागते.

किल्ले सज्जनगड


जिल्हा - सातारा


प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग पूर्वेकडे जाते या रांगेला शंभूमहादेव या नावाने ऒळखतात. या रांगेला तीन फाटे फुटलेले आहेत. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी.

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किमी अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोर्‍यात हा दुर्ग उभा आहे.
इतिहास :
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ’आश्वालायनगड’ म्हणू लागले. या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते, म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधले जात असे. चवथा बहमनी राजा महंमदशहा (१३५८ - १३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून धेतला.

शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले "सज्जनगङ". राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. दिनांक ३/११/१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले, पण ३/१२/१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तींची गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २/६/१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोती काटकर हयाला पत्र लिहले की, 
‘‘श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती. ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात, तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून कळो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये? या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा करणे. वेदमूर्ती बिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे. तो होईलया उपरी घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे या पत्रा प्रमाणे राहाटी करणे’’.

या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ’नौरसतारा’ म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

किल्ले बाणकोट / हिम्मतगड

 

बाणकोट / हिम्मतगड
जिल्हा - रत्नागिरी
महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या बाणकोट खाडी चे रक्षण करत बाणकोटचा किल्ला शतकानुशतक उभा आहे. बाणकोट खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे, ह्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर बाणकोटचा किल्ला बांधण्यात आला. बाणकोट किल्ल्यापासुन ३५ किमी अंतरावर असलेला मंडणगड किल्ला आणि द़ासगावची लेणी आजही या जून्या व्यापारी मार्गाची साक्ष देत उभी आहेत. अनेक राजवटी पाहिलेला बाणकोटचा किल्ला "हिम्मतगड " आणि " फोर्ट व्हिक्टोरीया" या नावांनीही ओळखाला जातो.
इतिहास :
बाणकोटच्या किल्ल्याचा सर्वात जूना उल्लेख ग्रीक प्रवासी प्लिनी ह्याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे. त्यानंतर इ.स. १५४८ पर्यंतचा या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. १५४८ साली हा किल्ला पोर्तुगिजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्हेजी आंग्रे यांनी हा गड काबिज करून त्यास "हिम्मतगड" असे नाव दिले. तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला. त्याने त्याला "फोर्ट व्हिक्टोरीया" नाव दिले. व्यापाराच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व बंदर फायदयाचे होत नव्हते, त्यामुळे इंग्रजांनी तो किल्ला पेशव्यांना परत केला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या पायथ्याशी गणपती मंदिर आहे. गडाला सर्व बाजुंनी जांभ्या दगडात खोदुन काढलेला खंदक आहे. गडाचा दरवाजा उत्तराभिमुख असुन सुंदर दगडी महिरपींनी सुशोभित केलेला आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवडया आहेत. उजव्या बाजूच्या देवडीत ६ पाण्याचे हौद आहेत. तिथुन पुढे गेल्यावर नगारखान्यात जाण्यासाठी डाव्या हाताला सुबक जीना आहे. त्यावरून वर गेल्यावर सावित्री नदी व सागराचा संगम आणि आजुबजुचा प्रदेश आपल्या दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पूर्व-पश्चिम बाजूस २ जीने आहेत. पश्चिमेकडील दरवाजाने तटाबाहेरील बुरूजावर जाता येते. हया बुरूजात खोल विहीर आहे ,ती आता बुजलेली आहे. पश्चिमेकडे बुरूजातच पहारेकर्‍यांसाठी खोली आहे. हया पाण्याच्या बुरूजात चोर दरवाजा आहे. बाणकोटहून वेळासकडे जाताना वाटेत "पाणबुरूज" किंवा मधला बूरूज लागतो. मुळ किल्ल्याला बळकटी आणण्यासाठी सिध्दीने हा बुरूज बांधला.

Wednesday, 12 October 2022

तू माझा आहेस फक्त माझा...!

तसं सह्याद्रीच अन माझं नातं खूपच जुनं.. अगदी कळत नसल्यापासून त्याच्या अंग खांद्यावर खेळलोय.. आजही तसाच खेळतोय म्हणा... परंतु सध्या त्याचं सौंदर्य फक्त बघत बसतो.. कधी वाटलंच.. तर कॅमेऱ्याने टिपायचं, नाही तर फक्त डोळ्यांमध्ये भरभरून घ्यायचं.

किती देखणा पर्वत आहे हा... राजबिंडा आणि रुबाबदार... अगदी मर्दानी आखाड्यात कसलेल्या मल्लासारखा...

"कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा" ही बिरूदे मिरवणारा हा जनरल सह्याद्री खरच खूप देखना आहे मित्रांनो..

परंतु सद्यस्थितीला या सह्याद्री पर्वताचे कपडे ओरबडून काढत आहेत लोक... डोंगर माथे बोडके केले, भरगच्च भरलेली हिरवी झाडे तोडली आणि सह्याद्रीला उघडा केलाय लोकांनी...

जो सह्याद्री अथांग अरबी समुद्राला दख्खनच्या पठारावर येण्यापासून रोखून धरतो, त्या सह्याद्रीची लक्तरे काढली आहेत आपण...?

असो खोलवर जाणार नाही, परंतु गेले कित्येक वर्ष (महाराष्ट्रातील) (कर्नाटकातील मलबार पाहताना अक्षरशः वेड लागते बर का.. लवकरच पाहायला मिळेल तुम्हाला यूट्यूब च्या माध्यमातून..) या सह्याद्रीच रौद्र राकट पण तितकच सुंदर रूप मला पाहायला मिळालं नव्हतं.

योगायोगानं काल तो दिवस उजाडला आणि त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये जाऊन स्वतःला हरवून बसलो. कारण तसं काही मोठं नव्हतं... सहज फिरायला जायचं होतं, परंतु कालच्या ठिकाणी जाणार होतो त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच पाऊल टाकणार होतो. त्यामुळे उत्सुकता होती की इथून माझा हा "सखासह्याद्री" मला दिसतो कसा ?

पण खरंच सांगतो मित्रांनो काल जो नजारा मी पाहिलाय तो अक्षरशः वेड लावणार होता. विचार करा मी असं म्हणतोय, मी सह्याद्री उभा आडवा भटकलोय, चालत, सायकलवर, गाडीवर, फोर व्हीलरने, मिळेल त्या वाहनाने फिरलोय.. अक्षरशा चप्पा चप्पा पाठ झालाय, दोन-चार बोटावर मोजणारी ठिकाणी सोडली तर सह्याद्रीतले कडे कपारी, पुरातन घाट वाटा, असंख्य उत्तुंग किल्ले, अगदी घरच्या पायऱ्यांसारखे पाठ झालेत, परंतु अगदी मनापासून खरं सांगतो गेल्या आठ-दहा वर्षात सह्याद्रीच इतकं देखणं रूप मी खरंच पाहिलं नव्हतं इतका सुंदर मला काल तो दिसला... (मला प्रत्यक्ष ओळखणारे बरेच लोक मला जिप्सी म्हणतात आणि त्यांना माहितेय मी सह्याद्रीत कसा फिरतोय..)

माझ्यासमोर अथांग निळ्या पाण्याने भरलेला जलाशय, त्याच्या पलीकडे पायथ्यापासून कमरक्यापर्यंत भरगच्च उंच झाडी आणि कमरक्याच्या झाडी पासून वरती हिरवा गार असा सह्याद्री... मध्येच त्या हिरवेपणाला कातळाच्या काळया पट्ट्या मारलेल्या होत्या... विराट, बिकट आणि उत्तुंग...

अगदी माझ्या कवेत न मावणारा... प्रचंड डामडौल असणारा.. पाचूचा हिरवा कातळकडा आणि समोर भरगच्च उंचीने मला रोखून कंबरेवर हाथ ठेऊन उभा राहिलेला विठ्ठलच जणू... आसा हा सह्याद्री मला या आधी कधीच नाही दिसला... मला तो कायम गर्द निळा काळा राम, कृष्ण महादेवच दिसला होता, आजही सावळा विठ्ठलच पण आज हात पसरून माझी वाट आडवली होती असा वाटत होता..

अक्षरशा मान ज्या बाजूला वळेल तिथपर्यंत फक्त आणि फक्त हा जनरल सह्याद्री, मला माझ्या कुशीत घेऊन कसा आहेस म्हणून विचारत होता..?

साधारणता आठ नऊ वर्षांपूर्वी या सह्याद्रीची एक पोस्ट टाकली होती, खूप व्हायरल झाली होती. एक छोटसं पत्र लिहिलं होतं त्याला... की मी तुझ्या प्रेमात आहे म्हणून...

काल देखील तसेच वाटलं, प्रेम तर जूनचं आहे, फक्त नव्याने झालं होतं आज... अगदी मनाच्या तळापासून...

या सह्याद्रीची असंख्य विविध रूपे मी दररोज अनुभवतोय, कित्येक गडकोट किल्ले भटकून झाले, (आकडा जवळजवळ २२० पार गेलाय) महाराष्ट्रातला जवळजवळ अर्धा सह्याद्री माझ्या PC मध्ये 'वरून ' कसा दिसतो ते शूट केला आहे. तुम्हाला हा  पाहायला मिळेलच पण उरलेला अर्धा लवकरच पूर्ण देखील होईल...

पण एक बोलू...? या सह्याद्रीच जे सौंदर्य आहे ते प्रत्येक दिवसाला निखरून येतं आणि त्याची एक झलक लवकरच तुम्हाला माझ्या काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.

तरीपण मित्रांनो एक सांगतो, काल जो सह्याद्री पाहिला तो खरच गेल्या आठ दहा वर्षात इतका सुंदर सह्याद्री मी अनुभवलाच नव्हता.. अंगात ताप असताना पण फिरणारा मी त्याचा वेडा..

असं वाटू लागलंय आज देखील पुन्हा एकदा तिथे जाऊन बसाव.. आणि हो... याच आठवड्यात पुन्हा तिथं चाललोय बर का... तसा मी खूप लकी आहे मन जिथं जातं तिथं मला जायला मिळतं.. l

मी स्वतःला कारणे देणे बंद केलं आहे...कारण वेळ देणे सुरू आहे...

© उमारण्यक 

माझं हक्काचं जंगल...!

माझं जंगल... दररोज नवं भासणारं.. अगदीच अनोळखी नाही... परंतु प्रत्येक पावलावर शिशिर ऋतुच्या पानगळती पासून चैत्राच्या सुंदर पालवीपर्यंत असंख्य रंग, असंख्य सुगंध आणि नवचैतन्य भरून ओंजळीतून माझ्या दारात घेऊन येणारं... माझं जंगल... मला आजही थोडं नवंच वाटलं...

जंगलाच्या अनोळखी पायवाटा, इथले भले मोठाले दगड, मातीचा तो मंद सुगंध, खळखळत वाहणारे छोटे ओढे, त्याच्या वाहणाऱ्या पाण्याचा तो नाद... वाऱ्याच्या झुळुकीबरोबर अलगद आपल्या आई-वडिलांचा हात सोडून वाऱ्यावर स्वार होणार एखादं उडणारे पान आणि मग मध्येच एखाद्या छोट्याशा फांदीवर बसून उगाचच शांत स्तब्ध असलेल्या या जंगलाला स्वतःच्या मंजुळ आवाजाने झोपेतून उठवणारे रानपक्षी... असे कित्येक नजारे या जंगलात दररोज पाहायला मिळतात मला...

कधी कधी असं देखील वाटतं की या जंगलाने मला कवेत घेतलं आहे, कारण की बऱ्याचदा इथे मला "मी" सापडतो... 

अगदी मातीवर पडलेली सूर्याची किरणे देखील कित्येक वर्षानंतर त्याच ठिकाणी त्या मातीला बिलगताना दिसतात, परंतु आज ती सर्व किरणे एका झाडामागून हळूच डोकावून पाहत होती. बहुदा माझ्याकडेच पाहत असतील, कारण बऱ्याच वर्षानंतर मी त्या दिव्य भास्कराला एकांतात भेटत होतो. एरवी तो मला सिमेंटच्या जंगलातून वर येताना आणि सिमेंटच्या जंगलातच विरघळताना दिसतो...पण आज त्याचं देखणं रूप काही वेगळंच होतं...

© उमारण्यक...

Tuesday, 10 May 2022

निदान या प्रसंगीतरी याला मडकं म्हणू नका..!

3 मे ला अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो होतो. माझे साहित्यिक मित्र ही खरेदीला आले होते.
ते माझ्या कुंभार मित्राला म्हणाले "मडकं दे".
तो पटकन त्यांच्याकडे बघून म्हणाला "या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका"

खरेतर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, "मग काय 
म्हणतात याला?". 

"स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला "केळी" व 
स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला "करा" म्हणतात". 

माझ्या मराठी शब्दकोषात दोन शब्द वाढले.

मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्तते नुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते अशी माहिती 
झाली.

पाण्याचा ...        माठ
अंत्यसंस्काराला...मडकं
नवरात्रात ...        घट
वाजविण्यासाठी...घटम्
संक्रांतीला...        सुगडं
दहिहंडीला...       हंडी
दही लावायला...   गाडगं
लक्ष्मीपूजनाचे...   बोळकं
लग्न विधीत...      अविघ्न कलश
आणि
अक्षय्य तृतीयेला...केळी व करा

खरंच आपली मराठी भाषा "समृद्ध" व "श्रीमंत" आहेच.

मला "मंगल प्रसंगी" हातात धरतात त्याला करा म्हणतात 
हे माहिती होते पण "अक्षय तृतीयेला" केळी व करा
म्हणतात माहिती नव्हते, तुम्हाला  माहीत होते का ? 

मला माहित नसलेली माहिती, एका मित्राने मला पाठवली आणि मी आपल्यासमोर मांडली.

झुकेगा नही साला..! मारेगा..!

सकाळी ऑफिसला यायला निघालो, वाटेत पाच माणसे अशी भेटली जी पुष्पा स्टाईलने खांद्यामध्ये आणि कानाच्या मध्ये मोबाईल अडकून गाडीवर फिरताना दिसली. 
एक ट्रक वाला (भर चौकात कानाला फोन, ट्रककडे लक्षच नाही) ज्याला मी स्वतः आडवले, एक रिक्षावाला (स्वतःची नाहीच पॅसेंजरचीही काळजी नाही) आणि तिघे बाईकस्वार मी यांची एमर्जेंसी समजू शकतो (?) कदाचित ...

परंतु चौकातल्या रस्त्यावरून भरचौकात घुसताना मोबाईल कानाला लावून निवांतपणे हे लोक जातातच कसे हे मला न उमगलेले कोड आहे.

हे लोक इतके निर्धास्तपणे चौकात शिरतात की जणू काही रस्त्याला यांच्याशिवाय दुसरे कोणीच नाहीये, रस्त्याचे नियम तर आपण पाळतच नाही, स्वतःच्या जीवाची काळजी घेत नाहीये परंतु किमान तुमच्यामुळे दुसऱ्याचा अपघात होऊन त्याचं नुकसान होऊ शकतं इतके तरी बुद्धी देवाने द्यायलाच हवी असे मला वाटते..!

तुमची काळजी कोण घरी करत नसेल पण इतरांची वाट बघणारी माणसं आहेत त्यांच्या घरी आणि त्यांचा संसार त्या एकाच व्यक्तीवर अवलंबून असतो...!
#roadsafety
#umaranyak
#lifeinwildlife

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...