Tuesday, 28 February 2023

किल्ले जीवधन

 

जिल्हा -पुणे
घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता.
इतिहास :
शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती, १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ’मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणार्‍या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्व:त… वजीर बनले. गाव गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे
पहाण्याची ठिकाणे :
गडाचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे गावकरी याला ’कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात.
पोहोचण्याच्या वाटा :
१ कल्याण - नगर मार्गे :-
कल्याण - नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात, हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे लागते.

किल्ले सज्जनगड


जिल्हा - सातारा


प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग पूर्वेकडे जाते या रांगेला शंभूमहादेव या नावाने ऒळखतात. या रांगेला तीन फाटे फुटलेले आहेत. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी.

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किमी अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोर्‍यात हा दुर्ग उभा आहे.
इतिहास :
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ’आश्वालायनगड’ म्हणू लागले. या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते, म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधले जात असे. चवथा बहमनी राजा महंमदशहा (१३५८ - १३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स.१६३२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याचा किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २ एप्रिल १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून धेतला.

शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले "सज्जनगङ". राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. दिनांक ३/११/१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले, पण ३/१२/१६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तींची गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २/६/१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोती काटकर हयाला पत्र लिहले की, 
‘‘श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती. ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात, तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून कळो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये? या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा करणे. वेदमूर्ती बिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे. तो होईलया उपरी घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे या पत्रा प्रमाणे राहाटी करणे’’.

या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून १७००ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ’नौरसतारा’ म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

किल्ले बाणकोट / हिम्मतगड

 

बाणकोट / हिम्मतगड
जिल्हा - रत्नागिरी
महाबळेश्वरी ऊगम पावणारी सावित्री नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या बाणकोट खाडी चे रक्षण करत बाणकोटचा किल्ला शतकानुशतक उभा आहे. बाणकोट खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे, ह्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सावित्री नदीच्या मुखावर बाणकोटचा किल्ला बांधण्यात आला. बाणकोट किल्ल्यापासुन ३५ किमी अंतरावर असलेला मंडणगड किल्ला आणि द़ासगावची लेणी आजही या जून्या व्यापारी मार्गाची साक्ष देत उभी आहेत. अनेक राजवटी पाहिलेला बाणकोटचा किल्ला "हिम्मतगड " आणि " फोर्ट व्हिक्टोरीया" या नावांनीही ओळखाला जातो.
इतिहास :
बाणकोटच्या किल्ल्याचा सर्वात जूना उल्लेख ग्रीक प्रवासी प्लिनी ह्याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे. त्यानंतर इ.स. १५४८ पर्यंतचा या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. १५४८ साली हा किल्ला पोर्तुगिजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्हेजी आंग्रे यांनी हा गड काबिज करून त्यास "हिम्मतगड" असे नाव दिले. तुळाजी आंग्रे आणि पेशवे यांच्यातील वितुष्टानंतर पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली बाणकोट किल्ला जिंकला. त्याने त्याला "फोर्ट व्हिक्टोरीया" नाव दिले. व्यापाराच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व बंदर फायदयाचे होत नव्हते, त्यामुळे इंग्रजांनी तो किल्ला पेशव्यांना परत केला.
पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या पायथ्याशी गणपती मंदिर आहे. गडाला सर्व बाजुंनी जांभ्या दगडात खोदुन काढलेला खंदक आहे. गडाचा दरवाजा उत्तराभिमुख असुन सुंदर दगडी महिरपींनी सुशोभित केलेला आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवडया आहेत. उजव्या बाजूच्या देवडीत ६ पाण्याचे हौद आहेत. तिथुन पुढे गेल्यावर नगारखान्यात जाण्यासाठी डाव्या हाताला सुबक जीना आहे. त्यावरून वर गेल्यावर सावित्री नदी व सागराचा संगम आणि आजुबजुचा प्रदेश आपल्या दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पूर्व-पश्चिम बाजूस २ जीने आहेत. पश्चिमेकडील दरवाजाने तटाबाहेरील बुरूजावर जाता येते. हया बुरूजात खोल विहीर आहे ,ती आता बुजलेली आहे. पश्चिमेकडे बुरूजातच पहारेकर्‍यांसाठी खोली आहे. हया पाण्याच्या बुरूजात चोर दरवाजा आहे. बाणकोटहून वेळासकडे जाताना वाटेत "पाणबुरूज" किंवा मधला बूरूज लागतो. मुळ किल्ल्याला बळकटी आणण्यासाठी सिध्दीने हा बुरूज बांधला.

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...