काळानंदिगड हा चंदगड तालुक्यातील एक देखणा किल्ला ! गेले १२ ते १५ वर्षे सतत या किल्ल्याला ३ ते ४ महिन्यातून एकदा भेट होतेच ! आज वेळ मिळाला आणि धावपळीत का असेना पण एकटा जाऊन बसलो त्याचा कुशीत !
गावाजवळच्या धनगरवाड्याजवळ गाडी लावली आणि गडाच्या अंगाखांद्यावर बागडायला सुरुवात केली, तशी गाडी वरपर्यंत गेली असती पण मला किल्ला चालत वर चढायला आवडते, आणि मी किल्ल्यावर रस्ता करायच्या मतप्रवाहाच्या विरोधी आहे, किल्ल्यापर्यंत रस्ता करा पण वरती एकदा का गाडी गेली की मग सुरू होतो त्या किल्ल्याचा बाजार ! प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, पत्रावळ्या, लेहेज कुरकुरेचे प्लास्टिक आणि पिशव्या !
खरच एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा की गडावर रस्ता करायची खरंच गरज आहे ?
काळानंदिगड हा इतिहासाच्या पुस्तकात नोंद केलेल्या किल्यांपैकी एक ! काळानंदिगडाचा उल्लेख सभासद बखरीत येतो. या बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.
युद्धनीतीमध्ये शत्रूच्या आक्रमनाचा मुकाबला करायचा असेल तर प्रथमतः आपल्या स्वतःच्या घराची मजबूती करावी लागते. काळानंदिगडाची मोक्याची जागा पाहता गोवा, कर्नाटक, सावंतवाडी प्रान्तातील असलेल्या शत्रुंवर नजर ठेवण्यासाठी व टेहळनीसाठी हा गड वसवलेला असावा.
गडफेरीला म्हणाल तर एक तास पुरेसा होतो पण मी एकटा आलो की ३ ते ४ तास हा हा म्हणता निघून जातात. त्याला कारणच तसे आहे, हे कातळ माझ्याशी बोलतात ! गोनीदांचे दुर्गप्रेमींना एक पत्र आहे त्यात त्यांनी गड कसा पहावा याचे तंत्र सांगितले आहे. ते म्हणतात, तो धावता पळता पाहता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलिक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्टया त्याचं महत्व, त्यांच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंड, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखर, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरुज त्यांची प्रवेशद्वारे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरच त्याचं महत्व ध्यानी येतं. नाहीतर आजकाल अर्ध्या दिवसात रायगड पाहणारी मंडळीही आहेत.
महाराष्ट्राचे लाडके भाई, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.
गडावर जर जायचे म्हंटले तर कलीवडे या गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग लागतात. एक मार्ग चारचाकी जाऊ शकेल असा आहे पण हा मार्ग पूर्णतः कच्चा आहे आणि दुसरा खुशकीचा अगदी गडकरी किव्हा ट्रेकर्स यांच्या सोयीचा ! पायी चालत गेल्यास साधारण एक तासात गडावर जाता येते.
गडाच्या पश्चिमेस तिल्लारी घाट, रामघाट व रायबाचा पारगड, ताम्रपर्णी नदी, उत्तरेस गंधर्वगड व सह्याद्रीच्या घनदाट पर्वतरांगा आहेत, दक्षिणेस तिलारी नदी, झाबंरे धरण प्रकल्प आहे. या गडास नैऋत्य दिशेकडून पाहिले तर बैठ्या नंदी सारखा दिसतो याचमुळे गडास काळानंदिगड किव्हा कलानिधिगड या नावानेही संबोधले जाते.
गडावर जांभाच्या दगडात लांब अशा ऐतिहासिक कालीन वाडयाचे अवशेष पाहायला मिळतात. कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचारचा मनोरा आहे व उर्वरित भागात गडाचे अवशेष आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ एकेकाळी शौर्य गाजवलेल्या दोन तोफा आपले स्वागत करतात.
गडावर भवानी देवीचे मंदिर असुन या मंदिरातच शिवलिंग व श्री गणेशाची पुरातन मूर्ति आहे. या मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.
गडावर असलेल्या बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागे पुरातन विहीर असुन यामध्ये वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे. या विहीरीलगतच भुयारी मार्ग आहे. लागुनच दक्षिणेला धाकलागड आहे. 'धाकला' म्हणजे लहान असा अर्थ होतो.
गडावरील मंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायर्यांचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली होती सध्या त्याची डागडुजी चालू असल्याने आता ती सुस्थितीत दिसते, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिर संकुलात अनेक पायर्या, देवळया व चौथरे इत्यादी दिसतात. विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढूूनकाळानंदड
पुढे चालत गेल्यावर येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी वाट बनवलेली दिसते. जवळ जवळ हा थोडा भाग सोडला तर संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे.
टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात. हे शिवकालीन शौचालय आपल्याला गडाची स्वच्छता कशी ठेवावी याचे उदाहरण घालून देते. शेजारीच आपणास जुना वाडा दिसतो. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते.
©उमाकांत चव्हाण
सह्याद्री संवर्धन केंद्र.
Umakant chavan
9657744283
No comments:
Post a Comment