Monday, 22 April 2019

भटकंती काळानंदीगडाची - उमाकांत चव्हाण




काळानंदिगड हा चंदगड तालुक्यातील एक देखणा किल्ला ! गेले १२ ते १५ वर्षे सतत या किल्ल्याला ३ ते ४ महिन्यातून एकदा भेट होतेच ! आज वेळ मिळाला आणि धावपळीत का असेना पण एकटा जाऊन बसलो त्याचा कुशीत !
गावाजवळच्या धनगरवाड्याजवळ गाडी लावली आणि गडाच्या अंगाखांद्यावर बागडायला सुरुवात केली, तशी गाडी वरपर्यंत गेली असती पण मला किल्ला चालत वर चढायला आवडते, आणि मी किल्ल्यावर रस्ता करायच्या मतप्रवाहाच्या विरोधी आहे, किल्ल्यापर्यंत रस्ता करा पण वरती एकदा का गाडी गेली की मग सुरू होतो त्या किल्ल्याचा बाजार ! प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, पत्रावळ्या, लेहेज कुरकुरेचे प्लास्टिक आणि पिशव्या !
खरच एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा की गडावर रस्ता करायची खरंच गरज आहे ?
काळानंदिगड हा इतिहासाच्या पुस्तकात नोंद केलेल्या किल्यांपैकी एक ! काळानंदिगडाचा उल्लेख सभासद बखरीत येतो. या बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.
युद्धनीतीमध्ये शत्रूच्या आक्रमनाचा मुकाबला करायचा असेल तर प्रथमतः आपल्या स्वतःच्या घराची मजबूती करावी लागते. काळानंदिगडाची मोक्याची जागा पाहता गोवा, कर्नाटक, सावंतवाडी प्रान्तातील असलेल्या शत्रुंवर नजर ठेवण्यासाठी व टेहळनीसाठी हा गड वसवलेला असावा.
गडफेरीला म्हणाल तर एक तास पुरेसा होतो पण मी एकटा आलो की ३ ते ४ तास हा हा म्हणता निघून जातात. त्याला कारणच तसे आहे, हे कातळ माझ्याशी बोलतात ! गोनीदांचे दुर्गप्रेमींना एक पत्र आहे त्यात त्यांनी गड कसा पहावा याचे तंत्र सांगितले आहे. ते म्हणतात, तो धावता पळता पाहता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलिक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्टया त्याचं महत्व, त्यांच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंड, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखर, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरुज त्यांची प्रवेशद्वारे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरच त्याचं महत्व ध्यानी येतं. नाहीतर आजकाल अर्ध्या दिवसात रायगड पाहणारी मंडळीही आहेत.

महाराष्ट्राचे लाडके भाई, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्‌टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्‌टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.
गडावर जर जायचे म्हंटले तर कलीवडे या गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग लागतात. एक मार्ग चारचाकी जाऊ शकेल असा आहे पण हा मार्ग पूर्णतः कच्चा आहे आणि दुसरा खुशकीचा अगदी गडकरी किव्हा ट्रेकर्स यांच्या सोयीचा ! पायी चालत गेल्यास साधारण एक तासात गडावर जाता येते.
गडाच्या पश्चिमेस तिल्लारी घाट, रामघाट व रायबाचा पारगड, ताम्रपर्णी नदी, उत्तरेस गंधर्वगड व सह्याद्रीच्या घनदाट पर्वतरांगा आहेत, दक्षिणेस तिलारी नदी, झाबंरे धरण प्रकल्प आहे. या गडास नैऋत्य दिशेकडून पाहिले तर बैठ्या नंदी सारखा दिसतो याचमुळे गडास काळानंदिगड किव्हा कलानिधिगड या नावानेही संबोधले जाते.
गडावर जांभाच्या दगडात लांब अशा ऐतिहासिक कालीन वाडयाचे अवशेष पाहायला मिळतात. कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचारचा मनोरा आहे व उर्वरित भागात गडाचे अवशेष आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ एकेकाळी शौर्य गाजवलेल्या दोन तोफा आपले स्वागत करतात.
गडावर भवानी देवीचे मंदिर असुन या मंदिरातच शिवलिंग व श्री गणेशाची पुरातन मूर्ति आहे. या मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.
गडावर असलेल्या बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागे पुरातन विहीर असुन यामध्ये वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे. या विहीरीलगतच भुयारी मार्ग आहे. लागुनच दक्षिणेला धाकलागड आहे. 'धाकला' म्हणजे लहान असा अर्थ होतो.
गडावरील मंदिरे पाहून पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायर्‍यांचा मार्ग खोल विवरात उतरताना दिसतो. येथे एका चौकोनी हौदात दोन विहिरी खोदलेल्या पहावयास मिळतात. यातील एक विहिर झाडांनी भरुन गेली होती सध्या त्याची डागडुजी चालू असल्याने आता ती सुस्थितीत दिसते, तर दुसरी विहिर वापरात आहे. या विहिर संकुलात अनेक पायर्‍या, देवळया व चौथरे इत्यादी दिसतात. विहिर संकुल पाहून आपण गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढूूनकाळानंदड
 पुढे चालत गेल्यावर येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी वाट बनवलेली दिसते. जवळ जवळ हा थोडा भाग सोडला तर संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे.
टॉवरकडील तटबंदीमध्ये आपणास जागोजागी शौचकूप दिसतात. हे शिवकालीन शौचालय आपल्याला गडाची स्वच्छता कशी ठेवावी याचे उदाहरण घालून देते. शेजारीच आपणास जुना वाडा दिसतो. गडाच्या पूर्व बाजूला ताम्रपर्णी नदीच्या नागमोडी पात्राचे मोहक दर्शन होते.

©उमाकांत चव्हाण
सह्याद्री संवर्धन केंद्र.
Umakant chavan
9657744283

Friday, 19 April 2019

Environment and Human living and wildlife with health.. by - Umakant Chavan

माझी तरुण पिढी मला कायम प्रेरणादायी आहे, त्यांना शिकवणे, समज देणे, आरोग्य, पर्यावरण आणि संस्कार यांची सांगड घालून त्यातून ट्रेक्स, निसर्ग, आत्मिक आंनद आणि समाधान, आणि या सर्वातून देश आणि राष्ट्र याची जाज्वल्य भक्ती हीच माझी देशाप्रती असलेली श्रद्धा असे मी मानतो..

भारतात देशप्रेम शिकवावे लागत नाही, रक्तात आहे ते,

भले काहींच्या मते थोडे रक्त खराब झाले असेलही (असेही नमुने आहेत की, ज्यांना ना देशाची काळजी ना स्वतःची) ! पण देशप्रेम आणि देशभक्ती ही भारतीयांच्या नसानसात आहेच !

आज पुन्हा एकदा या चिमुखल्यांच्या रूपाने मला ते माझ्या भावी पिढीमध्ये दिसले...

Environment, treks, physical fitness and awareness lecture held on New model English school, Kolhapur.

#imindian
#ilovemycountry
#umakantchavan
#oscorpinfomedia

Thursday, 18 April 2019

पर्यावरण संरक्षण कार्यशाळा ! देवराई आणि अधिवास !



It's amazing experience to Inaugurate of poster and Model exhibition of Environment awareness program 2019, DYP engineering college Civil Dept, arranged by HOD Prof. M.J.Patil sir, Co-ordinator Prof. Prajakta Altekar, and Prof. Nandini Misal along with entire team of Civil Dept students and all staff members.

विद्यार्थ्यांना आज पर्यावरण काय आहे हे मुळापासून शिकवणे खूप गरजेचे आहे, कारण आजूबाजूला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही जुन्या पिढीने खराब करूनच आताच्या या पिढीला दिलेली आहे. मग ती त्यांना जपायला सांगणे योग्य वाटते का ? का आपणच पहिलं या कार्याची सुरुवात करून मग त्यांना तो वारसा पुढे चालवण्यासाठी मदत करूया ?

मला असं वाटते की या येणाऱ्या नवीन पिढीला फक्त दिशा देण्याची गरज आहे त्यांच्यामध्ये आग तर भरभरून आहे फक्त त्या आगीचा वनवा न होता त्या अग्नीला योग्य दिशा मिळाली तर निश्चितच आपण पर्यावरण संरक्षण करता थोडाफार सहभाग घेऊ शकतो..

वाइल्ड लाईफ, वन्यजीवांचा अधिवास आणि देवराई या माझ्या हक्काच्या विषयात थोडेफार नवपण घेऊन डी वाय पाटील इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणातील एक नवीन विषय समजावून सांगताना आलेले नवीन अनुभव ...!

© Umakant chavan
#umakantchavan
#sahyadriconservationsociety
#sahyadri
#oscorpinfomedia

Thursday, 11 April 2019

सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींना एक संदेश !


फक्त वन्यजीव वाचवणे म्हणजे आपले काम नाही, तर वन्यजीवाच्या बरोबर स्वतःचे संरक्षण करणे आणि त्या वन्यजीवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणे हे काम जर आपण वन्यजीव प्रेमी म्हणून चांगल्या पद्धतीने केले तर निश्चितच वन्यजीवांना मदत होईल..!

नियतीने अखेर फास आवळला ! पण नक्की कुणाचा ?


©उमाकांत चव्हाण,
"नियतीने अखेर फास आवळला..!" असा मेसेज कालपासून प्रत्येक जणाच्या व्हाट्सअपवर, प्रत्येक ग्रुप मध्ये फिरत आहे.

केपटाउन या दक्षिण आफ्रिकेतील शहरात पाणी पूर्णपणे बंद झाले. किव्हा जगातलं पहिलं पाणी विरहित शहर म्हणून केप टाऊनला घोषित केले गेलं, अस आपल्याला व्हाट्सप च्या माध्यमातून कळलं !

पण खरच का हो हे असं झालंय ?

केपटाउन चा इतिहास तुम्ही पाहिला तर केपटाउन हे पृथ्वीच्या अगदी खालच्या बाजूला असलेले एक सुंदर शहर..! पर्यटनासाठी भरपूर लोक कायम इथं येत जात असतात. तुम्ही फोटो पाहिले तर अक्षरशः केपटाऊनच्या प्रेमात पडल इतकं सुंदर शहर..! 2013-14 साल या शहरातील किंबहुना या आसपासच्या परिसरातील पाण्याची पातळी हळू कमी होत गेली, त्याचे आकडे सोबत दिलेले आहेत.2014-15-16 या सालात हीच पातळी ज्याला आपण भूजलपातळी म्हणतो ती इतक्या प्रमाणात खाली गेली ही जवळजवळ पाण्याचे दुर्भिक्ष जाणवलं आणि पाणी कमतरता सुरू झाली.

कदाचित तुम्हाला आठवत असेल आपल्यातले काही क्रिकेटर दीड-दोन वर्षांपूर्वी क्रिकेट खेळायला गेले होते त्यावेळी आपण पाणी जास्त वापरतो म्हणून आपल्याला कमी पाण्यात आंघोळ करा म्हणून सांगण्यात आलं होतं ही न्यूज ही प्रत्येक चॅनलवर व्हायरल झाली होती.

मग हा मेसेज आजच का व्हायरल व्हावा ?

प्रत्येकाला वाटतं आपल्या भागात दुष्काळ आहे आणि आपण पाणी जपून वापरले पाहिजे पण खरंच अस वाटतं का बघा आठवून ? बघा जर आपण पाणी कसे वापरतो..?

पाण्याची उधळपट्टी करण्यात आपण खूप एक्सपर्ट आहे..! गाड्या धुणे, कुत्री मांजरे धुणे, म्हशी-गुर धुणे, उरलं तर बागेत पाणी मारणे, गरम होते म्हणून गच्चीवर पाणी मारणे, पाइपच्या पाईप झाडांच्या फांद्यामध्ये टाकून निघून जाणे, पाणी वर येईपर्यंत नळ बंद न करणे, गटरांमध्ये मध्ये पाणी वाहत सोडणे, काही नसलं तर भांडी धुणी काढा आणि गरम होतंय रस्त्यावर पाणी मारणे ह्या गोष्टी आपण सर्रास पाहतोच ना ?

आपल्या भागात, आपल्या आजूबाजूला हे आपल्याला होताना दिसते आणि आपलेच लोक करतात हे सगळं..! फक्त मेसेज फॉरवर्ड केले की "पाणी वाचवा...!" की झालं का आपलं काम ?

कधीतरी, काहीतरी महत्वपूर्ण सामाजिक संदेश देणारा मेेेसेज येतो. जो पाहतो तो दोन मिनिटे वरून नजर फिरवतात हेडलाईन वाचतात मेसेज कॉपी करतात आणि देतात ढकलून पुढं !

कुणासाठी करतोय ? काय करतोय ? याचं थोडही भान नसताना !

आम्ही खूप सधन भागात राहतो, आजूबाजुला खूप धरणं आणि बंधारे आहेत आणि धरणात भरपूर पाणी साठा आहे, म्हणूण, आम्ही काय केलं ? तर आमची चांगली सुपीक जमीन होती त्या जमिनीत उसाचे पीक घेतलं. काळ्या मातीत ऊस होताच, आता डोंगरावरही ऊस लावला. त्या उसाला भरपूर पाणी पाजायच, इतकं पाणी पाजायचं की, पाणी बांधातून ओव्हरफ्लोव्ह झालं पाहिजे. प्रत्येकाच्या शेतातून  ते रस्त्यावर वाहताना दिसले पाहिजे, तेव्हा आम्हाला कळणार की आमच्या ऊसाला पाणी पुरेसं झालं...!

उरलं तर आहेच की दुसऱ्या पिकांना..!!

आमच्याकडे जास्त पाणी आहे, म्हणून आम्ही जास्त युज करतो, पण लोकांना हे कळत नाहीये की जिथे पाण्याचा थेंब न् थेंब महत्त्वाचा आहे, तिथले लोक एक वाटीभरून पाणी फेकून देताना सुद्धा चार वेळा विचार करतात..! याउलट आम्ही काय करतो..? तर उधळपट्टी...!

आहे त्या गोष्टीचे संवर्धन करणे किंवा साठवून ठेवणे किंवा त्या गोष्टीचा मोल जाणणे ही खरी गरज आहे ना..? की केपटाऊनमध्ये पाणी कमतरता झाली म्हणून आम्ही मेसेज करतोय...?

आमचे मित्र मेसेज चांगला आहे म्हणून फॉरवर्ड करतात, पण त्यांना मेसेज मधला मतितार्थ जाणून तस वर्तणूक करायला खरंच जमतं का ? आणि खरच जर मनापासून तो मेसेज तुम्ही वाचून फॉरवर्ड केला असाल तर निश्चितच उद्यापासून पाणी वापरताना चार वेळा विचार करा...! की आपण पाणी वापरतो त्या पाण्याचं मोल काय आहे ?

माझा हा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्याला विरोध नाहीये, माझा विरोध आहे असले मेसेज फॉरवर्ड करून विसरून जाणाऱ्या माणसाला...!!
(काल एकाने हा मेसेज फॉरवर्ड केला आणि तोच दुपारी पाईपने स्वतःची कार धुताना दारात मला दिसला)

केपटाउन मधली पाण्याची परिस्थिती आहे हे गेले चार-पाच वर्षे अशीच चालू आहे, आता ते फक्त हायलाईट झाले एवढेच मला सांगायचे आहे. याच्या आधीही अशीच कंडीशन होती आणि फक्त केपटाऊनच का ? जगातली कित्येक शहरात असेच पाण्याचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, आणि हे प्रॉब्लेम आत्ता चालू झालेले नाहीत. विदर्भात जाऊन किंवा मराठवाड्यात जाऊन पहा दुष्काळ म्हणजे काय असतो केपटाऊन चे फोटो पाहून केप टाउन ची बातमी स्प्रेड करण्यापेक्षा आपल्या भागात जे झाले आहे एकदा बघा आणि स्वतः बदलायला शिका! कारण आपल्याकडे आहे म्हणून आपण भरपूर वापरतोय पण ज्या दिवशी संपेल ना त्यादिवशी मेसेज वाचण्यासाठी सुद्धा डोळ्यात पाणी शिल्लक राहणार नाही !
पाणी खरच बहुमोल आहे त्याचा वापर चांगला करा जिथे गरज आहेत जितकी गरज आहे तितकच पाणी वापरा, कारण कोणीतरी म्हणला आहे तिसरे महायुद्ध हे फक्त पाण्यामुळे होणार आहे !

Friday, 5 April 2019

गुढी उभी करा आनंददायी ! पर्यावरण पूरक !

गुढीपाडवा स्पेशल

मित्रांनो,
आपण दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असतो, नविन वर्षाचा आनंद, घरात पुरणपोळी आणि साखरगाठी खाऊन तोंड गोड करतो, संध्याकाळी गुढी उतरली आणि काठी माळावर टाकून देतो, काही ठिकाणी ज्या काठीवर आज साडी असते त्याच काठीवर दुसऱ्या दिवसापासून कपडे येतात. असो..!

आपण सारे भारतीय सण आणि उत्सव आपण खूप चांगल्या पद्धतीने साजरे करतो. पण आज-काल जी शो ऑफ किंवा दिखावा करायची पद्धत आपल्या समाजात रुळलेली आहे ती खरे तर खूप चुकीची आहे.

आपले सण आणि उत्सव हे कायमच पर्यावरण पुरक होते आणि राहतील, पण त्या मध्ये काही जणांनी जे काही नवीन नको असलेल्या पद्धती घुसवल्या आहेत ते नक्कीच चांगले नाहीये.

दरवर्षी दसऱ्याला कोल्हापूर मध्ये १७ ते १८ टन आपटा तुटतो, जो संध्याकाळी रोडवर पसरलेला असतो, अगदी काही तासातच !

खरे तर पांडवांनी शस्त्रे शमी च्या झाडावर लपवली होती, कालांतराने शमी ची झाडे कमी झाल्यामुळे आपण आपटा वापरू लागलो, आणि आता आपण आपटा कमी झाल्यामुळे कांचनारची पाने वापरतोय.

वास्तविक हा तुटलेला आपटा आपण गाई आणि म्हेशींसाठी वापरू शकत होतो, आपट्याच्या पानामुळे जनावरांच्या दुधात वाढ होते.

आता पण सध्य स्थिति वेगळी नाहीये. कोल्हापूर मध्ये आणि आसपास जवळ साधारणतः ४ लाख गुढ्या उभा राहिल्या आणि तेवढेच बांबूं तुटले गेले व कडुनिंबाची झाडे पण तुटलीत.

बांबू आणि तत्सम वर्गीय वनस्पती हे हत्ती आणि गव्यांचे खाद्य आहे, तसेच पर्यावरणासाठी सुद्धा हि झाडे महत्वाची आहेत, पण आता बांबू व तत्सम झाडे कमी झाल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वावर गदा आलेली आहे.

शिवाय आपल्याला हे माहित आहेच की पश्चिम घाटात कडुनिंबाची झाडे येत नाहीत जी फक्त माळरान किंवा सपाटीवरच येतात, आजकाल उन्हाचा तडाखा किती वाढला आहे हे पण आपण पाहताच आहे, कडुनिंब एक औषधी झाड आहे जे उपयोगी आहे तसेच गरजेच्या वेळी माळरानावर उन्हापासून वाचण्यासाठी सुद्या उपयोगी पडते,आणि अश्या प्रकारे जर आपण जसे तोडायची ठरवली तर मग आधीच वाढलेल्या ठिकाणी जमिनीची धूप वाढेल आणि तापमान पण वाढणार.

मी संस्कृतीच्या विरोधात नाहीये पण संस्कृतीच्या नावाखाली जे विकृतीकरण चालू झालय ते मला पटत नाही. याचा अर्थ असा नाहीये की गुढ्या उभ्याच नका करू, त्यापेक्षा एक काठी किती दिवस वापरता येईल याकडे लक्ष द्या आणि शक्य झाल्यास फक्त झाडे तोडणे कमी करा, लावायची तशी पण कोणती ते बऱ्याच लोकांना माहीत नसते !

भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण आणि उत्सव पर्यावरण पूरक आहेत आणि अशी संस्कृती जगात सर्वमान्य झालेली असताना आपण त्या संस्कृतीमद्ये विकृती का निर्माण होऊ देतोय हे मला कळतं नाहीये ?

गुढी पाडव्याच्या एक बांबु किमान ६ ते ७ वर्ष तरी चालू शकतो, माझ्या स्वतःच्या घरातील गुढीची काठी गेली १० वर्षे झाली आम्ही वापरतोय, दर वर्षी नवीन काठी घ्यायचा अट्टाहास का..? आणि मार्केट मध्ये सण आणि उत्सवाचे जे बाजारीकरण झालंय ते कधी थांबणार..?

(गुढीची काठी घेताना बऱ्याच जणांना काल परवा हा अनुभव आलेला असेलच)

आपण आपले सण आपली संस्कृति जतन केलीच पाहिजे पण मूळ बेसिक गोष्टी समजून ती आहे तशी ठेवणे हे आपले कर्तव्य नाही काय?

चूक भूल दयावी घ्यावी पण मनात आले म्हणून एवढा मोठा लेख लिहिला..!  कारण मला तर या वर्षी उन्हाळा खूप जाणवतोय..!

आपला,
उमाकांत चव्हाण,
सह्याद्री संवर्धन केंद्र,
कोल्हापूर.

किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...