Tuesday, 18 May 2021

चक्रीवादळं मानवनिर्मित ? कोणाचे परिणाम आहेत ?

परित्राणाय साधूनां..! 4.8।।

©उमाकांत चव्हाण.

कालच एक भयंकर वादळ येऊन गेलं, सध्या ते गुजरातच्या प्रदेशात आहे. किती आणि काय विध्वंस होणार हे कोणालाही सांगता येणार नाही. परंतु विध्वंस होणार हे नक्की आणि हा विध्वंस होतच राहणार हे देखील नक्की... 

या मागची ज्यावेळेस तात्कालीन कारण आपण शोधायला सुरुवात करतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की हे चक्रीवादळ देखील मानवानेच पर्यावरणाची केलेली हानी आहे. (आता काही लोक म्हणतील चक्रीवादळ माणसाने तयार केलेले नाहीत) परंतु हे खरंच सत्य आहे का ? याचा विचार करणे देखील गरजेचे आहे.

मानवानं खरंतर केलं काय या पृथ्वीवर येऊन ? याचा विचार करणं खरच गरजेचे आहे. मानवाने पृथ्वीवर येऊन केला फक्त आणि फक्त विनाश..! 
त्याच्या पलीकडे त्याला कधीही काहीही जमलेलं नाहीये.

एक छोटंसं उदाहरण देतो, 

चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय ?

समजा एखाद्या या ठिकाणचे वातावरण आणि तापमान जर उष्णतेमुळे तापले आणि तप्त वातावरणामुळे तिथली हवा विरळ झाली तर ती वरच्या बाजूला सरकते, तेव्हा आजूबाजूच्या प्रदेशातील थंड हवा ती रिकामी जागा भरून काढण्याकरिता जोराने वाहू लागते, (मित्रांनो चे सहावी सातवी च्या पुस्तकात शिकवले आहे बर का ! खूप मोठं रॉकेट सायन्स असं काही नाही ) परंतु यामध्ये थोडेसे फॅक्ट असे आहेत की, जे इथं मुद्दामहून सांगू इच्छितो, ज्या वेळेस ही चक्रीवादळं समुद्रात निर्माण होतात त्यावेळेस त्यांना "सायक्लोन" असे म्हटले, जात आणि ज्या वेळेस अशी वादळ जमिनीवर निर्माण होतात त्यावेळेस त्यांना "टोरनॅडो" असे म्हणतात. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रदेशात निर्माण होणाऱ्या वादळांना प्रदेशानुसार वेगळी नावे देखील आहेत. सांगण्याचा उद्देश हाच की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणचे तापमान तापते आणि तिथली हवा विरळ होऊन वरती ढकलली जाते, त्यावेळेस आजूबाजूची थंड प्रदेशातील हवा ही जागा ही पोकळी भरून काढण्याकरिता वाहू लागते आणि अशाप्रकारे वादळांचा जन्म होतो.

जर जमिनीवरही वादळ निर्माण झाले तर त्यांचा वेग खूप जास्त नसतो त्यामुळे कदाचित हानी कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. परंतु जर समुद्री प्रदेशात किंवा पाण्यावर ही वादळे निर्माण झाली तर त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा नसल्यामुळे त्यांचा उपयोग खूपच जास्त वाढतो आणि त्यामुळे होणारी हानी देखील खूप जास्त प्रमाणात होते.

चक्रीवादळे ज्यावेळेस पाण्यावरून किंवा अति उष्ण भागावरून वाहतात त्यावेळेस त्यांचे स्पीड इतके जास्त वाढते की त्यांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना ती उधळून लावतात. याउलट जमिनीवरून किंवा थंड प्रदेशातून जर हे वादळ वाहत असेल तर त्याचा वेग मंदावतो व व पर्जन्य स्वरूपात ते वादळ निसर्गात विरले जाते. सहाजिकच आहे समुद्रात ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट भागाच्या भोवती जड वारे वर्तुळाकार फिरायला सुरुवात करतात त्यावेळेस चक्रीवादळ निर्माण होते या वादळांचे त्यांच्या वाहण्याच्या वेगा वरून वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत परंतु यातील सर्वसाधारण ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळापेक्षा जर वादळ जास्त वेगाने वाहू लागले तर निश्चितच वित्त हानी व मनुष्य हानी होण्याचे चान्सेस वाढतात.

एक वादळ तयार व्हायला जवळजवळ आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याचमुळे आपण आपल्याकडील असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून वादळाचा पुरेपूर अंदाज आणि त्याची दिशा ओळखू शकतो.

हे झालं वादळा बद्दल थोडसं परंतु ही वादळ निर्माण का होतात ?आणि माणसाचा यात काय हात आहे ? ते देखील आपण इथं पाहणार आहोत.

मित्रांनो, ही वादळे निर्माण काशी होतात हे तर मी सांगितले, पण प्रत्येक रोग निर्माण होण्याच्या मागे काहीतरी तात्कालिक कारण असत, हे देखील तितकेच सत्य आहे.
 
मुळात एखाद्या भागाचे तापमान का वाढते ? याचा जर तुम्ही विचार केला तर तापमान वाढीला सर्वस्वी जबाबदार कोण हे देखील तुम्हाला लक्षात आलेच असेल. मग त्यासाठी असलेली कारणे म्हणजे भरमसाठ बेसुमार होणारी वृक्षतोड, पाण्याचा अतिवापर, जमिनीची होणारी धूप, मोठमोठाली वाहने आणि त्यांच्या मुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे वाढत जाणारी तापमानवाढ, अति शहरीकरण, विध्वंसक विकास प्रकल्प, नैसर्गिक जंगले आणि डोंगर माथे यांची होणारी कत्तल हे सर्व कोण करत आहे ? 

मानवच ना..!

मग या वादळांना कोण जन्माला घालत आहे हे आपल्याला सांगायला हवेच का ?

कधी नव्हे ती अचानक जन्माला येणारी चक्रीवादळे, हवामान बदल हे आपली नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करण्याचे परिणाम आहेत. जे आपण आणि आपली पुढची पिढी भोगणार आहोत. (यातून सुटका करून घेण्याचा कालावधी 7 ते 8 वर्षांपूर्वी आपण गमावला आहे) त्यासाठी आता सज्ज राहिलेच पाहिजे. 

पण सामान्य जनता यामध्ये पिसून जात आहे आणि आणि फक्त राजकीय स्वार्थ साधण्याकरिता काही लोक हे नैसर्गिक साधन संपत्ती आणि साठे उध्वस्त करत आहेत. 

निसर्ग जेव्हा कोपतो त्यावेळेस तो सांगून कुठलीही गोष्ट करत नाही, मग कोरोना, असुदे चक्रीवादळ असू दे, पूर असू दे, दुष्काळ असू दे, ढगफुटी असू दे किंवा कोणतेही नैसर्गिक आपत्ती..!

माणूस या आपत्ती समोर कधीही काही करू शकणार नाही, म्हणून लक्षात घ्यायला हवे आणि शाश्वत जीवनशैली जोपर्यंत मानव जगायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत विध्वंस तर होणारच..! 

या सूचना आहेत निसर्गानं आपल्याला दिलेल्या या ओळखता आल्या पाहिजेत कारण की गीतेत भगवंताने सांगितलेलं आहे.

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।

©उमाकांत चव्हाण.

Saturday, 10 April 2021



 प्रत्येक पर्वत पर मणि-माणिक्य ही प्राप्त होते हैं  प्रत्येक हाथी के मस्तक से मुक्ता-मणि प्राप्त होती है ।

भटकंती - घुमटीच्या बहिरीची - १

©उमाकांत चव्हाण

"काका, अशा ठिकाणी चाललोय जिथं माणसं सहसा जात नाहीत. मला माहित नाही तिथे काय मिळेल ? पण काहीतरी शोधतोय जे बरेच दिवस मनात घुसमटत होतं...!" 

"नितीन भोसले ! त्यांचे नाव, तु जसा फिरतोस तसंच व्यक्तिमत्व..!"

"ठीक आहे, त्यांचा नंबर मला मेसेज करा आणि माझा नंबर त्यांना."

"फोन करतो थोड्याच वेळात !"

नितीन भोसले सरांचा फोन आला. "उमाकांत बोलताय का ?"

मी कॉफी पीत बसलो होतो, त्यामुळे गप्पा मारायला थोडा वेळ होता.

"मी नितीन भोसले, मिलिंद गडकरी यांनी तुमचा नंबर दिला, उद्या तुम्ही कुठेतरी फिरायला चाललाय असं कळलं ! काय प्लॅन आहे ?"

मी शक्यतो आता कुठं, कसं, का फिरतो हे कुणाशी बोलत बसत नाही. विनाकारण आता वेळ वाया घालवणे मला योग्य वाटत नाही. तरीदेखील त्यांना फक्त एवढेच सांगितले,

"जावळीच्या ढवळ जोर खोर्यात चाललोय..! सकाळी सहाला निघायचं, रात्री जिथे वाटेल तिथे मंदिर वगैरेमध्ये मुक्काम आणि एका छोट्याशा नदीचा उगम स्थान पाहायचे आहे, इतकच...!" 

"ठीक आहे मी देखील येतो..!"

माझ्या डोक्यात नियोजन चालले होते, दोन दिवस हातात आहेत. काय काय करायचं ? एक तर मला कृष्णाच्या उगमाला जायचं, होतं दुसरी गोष्ट म्हणजे जावळीच्या जोर खोर्‍यात जायचं असं गेले सोळा सतरा वर्षे ठरवतोय. ज्यावेळेस आर्थर सीट पॉइंट पाहायला महाबळेश्वरला जातो, त्यावेळेस ही दरी आणि ते घनदाट जंगल मला खुणावत असते.

एकदा डेरिंग करून ऑर्थरसीट पॉईंट वरून उतरायला सुरुवात केली. थोडी कडेकपाऱ्यात हातापायाची बोटे अडकून खाली उतरलो थोडी घसरण आणि वार्‍याचा प्रचंड वेग..! एक कातळकडा कड्यावरची धार या धारेतून हळू खाली उतरायला सुरुवात केली दीडशे फूट उतरल्यानंतर विंडो पॉईंट आला. तोवर ऑर्थरसीट पॉईंटवर बघ्यांची गर्दी झाली होती. बऱ्याच जणांना वाटलं मी सुसाईड करतोय.

दीडशे ते दोनशे लोक ऑर्थरसीट वरून माझ्याकडे पाहत गलका करत होती. शेवटी वैतागलो आणि या हौशी बघ्यांना समजावत विंडो पॉईंटवरून वरती आलो, हे स्वप्न अर्धवटच राहिलं.

एकदा चंद्र गडाच्या पायथ्याला गेलो होतो चंद्रगड ते आर्थरसीट हा महाराष्ट्रातील प्रचंड अवघड ट्रेक. साधारणता आठ-नऊ तासांचा शिवाय कातळ कड्यातून  जाणारा. सलग चालावे लागते. फक्त एक ते दीड फुटाची वाट..!  एका बाजूला खडा कातळ तर दुसऱ्या बाजूला घनदाट निबीड अरण्य असलेली खोल दरी ! अशा भागातून चालताना अक्षरशः ट्रेकिंगचे सगळे कसब पणाला लागते. भलेभले लोक या ट्रेकला एक तर माघारी फिरतात किंवा गिव्ह अप करतात. मुख्यता चंद्रगड पाहिल्यानंतर या ट्रेकला येणारे ट्रेकर्स पुढे जायचं नाही असे ठरवतात.

जोरच्या या खोऱ्यात कधी ना कधी उतरायचं असं कित्येक दिवस मनात बाळगून होतो पहिल्यांदा आर्थरसीट पाहिला त्यावेळी मनात आलं, जावळीच्या घनदाट जंगलात वारा, वाघ आणि मराठ्यांशिवाय कोणी उतरुच शकत नाही...! त्याच दिवशी ठरवलं एक दिवस असा येईल की या घनदाट अरण्यात मी एकटा दिवसभर फिरत असेन आणि शेवटी तो दिवस आला होता...१ एक जून २०१९.


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - २

©उमाकांत चव्हाण

जंगलं आता जंगलं राहिली नाहीत !

नियोजन, प्लॅनिंग असं काही नाही. फक्त कृष्णाचा उगम पाहायचा आणि जावळीच्या खोऱ्यातल्या घुमटीच्या भैरीला भेटून यायचं, इतकच ठरवलं होतं. जर वेळ मिळाला तर रायरेश्वराला माथा टेकवायचा नाहीतर परतीच्या प्रवासाला कोल्हापूर गाठायचं...

ढवळजोरच्या खोऱ्यात जाऊन करायचं काय काहीही माहित नव्हतं. ना वाट, ना रस्ता, ना तिथे खाण्यापिण्याची सोय, ना तिथे किती वेळ लागेल याचे काही नियोजन...!

महाराष्ट्रातले बोटावर मोजण्यासारखे पाच-सहा ट्रेकरूट  सोडले तर जवळपास संपूर्ण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मी फुलपाखरासारखा स्वच्छंदी बागडलो आहे.

पारचा घाट, बिरमनीचा टप्पा, वरंधाघाट, ताम्हणी, कावळ्या, मढेघाट,शेवत्या, काजीर्डा, तिवरा, जुना अनुस्कुरा, हिवरा, नरडवे, सोनगड, तिलारी, कोदाळी, गरुड माची, कुर्डुगड, अकोल, सांदोशी, घोळ, हातलोट, झोलाई, करंदोशी, उचत, मालदेव, चोरवणे, नावजा, पाथरपुंज, कुंडी, मुचूकुंद, खोर्णीको आणि कुंभवडे ही इंटेरियरची काही नावे घेता येतील  (यातली बरीच बऱ्याच लोकांना माहीत नाहीत आणि इथं वाटाही नाहीत) हे भाग असे आहेत जिथं सहसा माणसं जात नाहीत. खूप घनदाट निबीड अरण्य आणि डोंगराचे कातळकडे यातून त्या दरीत उतरून खालच्या गावात जायचं. हे सगळं का करायचं तर फक्त एक आत्मिक समाधान !बाकी काही नाही ! जाताना अक्षरशा तुमचा जीव पणाला लागतो. निश्चितच एक छोटी चूक तुमच्या आयुष्याचा शेवट करू शकते. अशा या वाटा अशाच राहाव्यात हीच प्रार्थना..!

यातील काही वाटा जश्या सह्याद्रीत आहेत तश्याच कर्नाटकात देखील आहेत. शरावती व्हॅली, याना, अगुंबे, काली, श्रिंगेरी, माडिकेरी, कूर्ग, सायलेंट व्हॅली हे भाग देखील फिरलो. पण कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या जंगलात सहसा एकट्याला जाता येते नाही. जरी परवानगी मिळाली तरी हे जंगल इतके घनदाट आहे आणि इतके वन्यप्राणी या जंगलात आहेत की या जंगलातून परत येणे जवळजवळ अशक्यच..!

त्यामुळे शक्यतो फॉरेस्ट च्या मदतीने या जंगलात शिरलो, ठिकाणी स्थानिक लोक देखील ओळखीची झाली. पण जेव्हा जेव्हा या जंगलात जातो तेव्हा आजही निसर्गाचा आत्मिक आनंद मिळतो.

सध्या अस जंगल  आपल्याकडे खूप कमी झालाय असं वाटतं. तरीदेखील महाराष्ट्रातील काही घनदाट अरण्य आणि घाटवाटा अजून देखील आहे तश्या अवस्थेत आहेत.(यांचे पिकनिक पॉईंट आणि फालतू पर्यटन न होतो इतकीच सदिच्छा..!) त्यापैकीच एक म्हणजे जावळीतील ढवळजोर चे खोरे..!

ढवळे घाटातील ढवळगड किंवा चंद्रगड नामकरण असलेल्या या किल्ल्याच्या अखत्यारीत जी खोरी आहेत ते इतकं निर्बीड आणि सुनसान आहेत की क्वचितच एखादा विचार करू शकेल या भागात फिरायचं !

पण म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही..! तसंच काहीसं माझं..!सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळल्याशिवाय मला झोपच लागत नाही. या घाटवाटा, हे कातळकडे रक्ता रक्तात भिनले आहेत. यांच्याशी काहीतरी पूर्वजन्मीचं नातं निश्चितच असणार आहे, यात शंकाच नाही. 

त्यामुळे दोन दिवसाची मिळालेली ही सुट्टी याच भागात घालवायची असं ठरवलं होतं ग्रुप वर आणि बऱ्याच जणांना मेसेज केले, कोणी येणार असेल तर, कुठे चाललोय ? हे न विचारता यायची तयारी ठेवा ! नाहीतर येऊच नका !

कारण आजकाल बरेच जण मला विचारतात ट्रेकला गेला पण बोलवलं नाही आणि ज्या वेळेस मी सांगतो त्यावेळेस मग कुठे जाणार आहे ? किती वाजता जाणार ? कशाला जाणार आहे ?तिथे काय मिळणार ? किती खर्च येणार ? कसं जायचं ? कुठे राहायचं ? काय खायचं ? इतक्या लावकर का ? (मला अक्कल नाहीये आणि झोप नाही लागत असाच अर्थ निघतो) इतके निरर्थक.. (हो याला मी निरर्थकच म्हणतो) असंख्य प्रश्न विचारून नुसतं माहिती घेतात. एकाची देखील येण्याची तयारी नसते. विनाकारण यात माझा आणि स्वतःचा वेळ खर्च.. त्यापेक्षा आता कुणालाही न सांगता मी सरळ निघतो.


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - ३

©उमाकांत चव्हाण

वयावरून माणूस ओळखू नये..!

यंदाच्या जून महिन्यात थोडं वेगळंच प्लॅन केलं होतं. ढवळजोरचे खोरे मागासलेले, या भागात ना रस्ता, ना लाईट, ना पाण्याच्या सोयी, अगदी दोन-तीन धनगरवाडे, तिथून पुढे जवळजवळ दहा पंधरा किलोमीटर काहीही नाही. फक्त आरण्य आणि वैशिष्ट्य म्हणजे मे महिन्यात देखील आजूबाजूचा संपूर्ण डोंगर हिरवागार..! इतकं घनदाट..!

या भागात वेदगंगा आणि कृष्णेचा उगम झालेला आहे. डोंगराच्या एका बाजूला सावित्री नदी देखील उगम पावते. हा पट्टा म्हणजे महाबळेश्वरच्या आर्थरसीट वरून जी दरी खाली दिसते तोच.

पहिले तर चंद्रगडावरुन घुमटी द्वारे सरळ अर्थ सीटला यायचे असा प्लॅन होता. पण तितका वेळ नसल्यामुळे फक्त घुमटीत जायचं आणि जोरच्या खोऱ्यात फिरायचं इतकच ठरवलं.

मिलिंद काकांनी ज्या नितीन भोसलेंचा नंबर दिला होता त्यांच्याशी बोलणं झाल्यावर त्यांना फक्त एवढंच सांगितलं, "आज ३१ मे, मी मंथ एंड असल्यामुळे थोडा वेळ लागेल, थोडा कामात बिझी आहे. संध्याकाळी तुम्हाला फोन करून नियोजन सांगतो, फक्त उद्या सकाळी लवकर निघायचं एवढ लक्षात राहूदे."

या व्यक्तीला मी तसं पाहिलं नव्हतं. त्यामुळे ते किती चालतील, कसे चालतील आणि माझ्या ट्रेकच्या लिस्टमधील फोर्थ ग्रेडच्या म्हणजे अवघड ट्रेक साठी तयार असतील की नाही ? ही मनात शंका होती.

पण या व्यक्तीने होकार दिल्या दिल्या कुठेतरी मनात जाणवल की कुठल्या ठिकाणी जायचं आहे, हे माहीत नसताना देखील जी व्यक्ती येतो म्हणते ती निश्चितच त्या मानसिक तयारीची असणार. 

अर्ध्याएक तासातच त्यांची मला फेसबुक वर रिक्वेस्ट आली. मी फेसबुक वरील रिक्वेस्ट एक्सेप्ट करायच्या आधी त्या व्यक्तीचं संपूर्ण प्रोफाइल चेक करतो. त्यामध्ये त्यांनी केलेल्या पोस्ट, त्यांचे मित्र, त्यांनी लाईक केलेल्या पोस्ट किंवा काही फोटोग्राफ्स हे पाहिल्याशिवाय म्हणजेच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजल्याशिवाय कुणाचेही रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाही. 

तसंच यांचीदेखील रिक्वेस्ट एक्सेप्ट करायच्या आधी त्यांचे काही फोटो पाहिले, वय ६० च्या पुढे असावे मग मनात एक विचार आला की यांना जमेल का चालयला ? मी जातो किंवा ऑफ बीट भटकंती करतो तिथं  माझ्याबरोबर आल्यानंतर लोकं परत माझ्याबरोबर येताना दहा वेळा विचार करतात. ज्या भागात जिथे मी जातो तिथं रस्ते आणि मळलेल्या वाटा नसतातच.. ! शक्यतो वाटा माझ्या मीच स्वतः तयार करतो. त्यामुळे कुठूनही कसं जावं लागतं. कारवीचे जंगल, करवंदाच्या जाळ्या, काटेरी झुडपे म्हणजे माझ्यासाठी हक्काची निवासस्थाने..! याच्यामधून स्वतःची वाट बनवून मनात असलेल्या ठिकाणी पोहोचणे म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख आहे.

अशा ठिकाणी एखाद्या नवख्या व्यक्तीला शिवाय ज्यांनी वयाची ६० ठी गाठली आहे अशा व्यक्तीला घेऊन जाणे म्हणजे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी रिस्क होती. कारण जर त्यांना तिथं काही त्रास झाला तर असले प्रसंग खूप अवघड असतात.

त्यामुळे मी मिलिंद काकांना मेसेज टाकून विचारलं, की ते  चालतील का ? कारण मी पडलो भटका ! माझ्याबरोबर जंगलात फिरणे म्हणजे नॉर्मल माणसाला सहसा प्रचंड त्रास होतो. तर मिलिंद काकांचा रिप्लाय आला तुझ्यासारखाच भटका आहे तो बिनधास्त जा ! आणि झालं देखील तसेच.

भोसले साहेब वयाच्या मानाने खूपच फिट आहेत. महाराष्ट्रातील बरेच गडकिल्ल्यांच्या वाटा त्यांनी बऱ्याच वेळा तूडलेल्या आहेत. आमच्यातील बरेच भटके कॉमन मित्र त्यांच्या ओळखीचे असल्यामुळे त्यांच्याबद्दल खात्री आणि आदर दोन्ही निर्माण झाला.

ही व्यक्ती कोणत्याही वयात फिट होणारी आणि अशी लोकं मला प्रचंड आवडतात. कारण की हि लोकं पाण्यासारखी निर्मळ आणि पवित्र असतात. त्यांच्यात जो रंग टाकाल त्या रंगाची होऊन जातात पण स्वतःचा असा एक वेगळा हलका रंग देखील असतो जो अप्रतिमच..!


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - ४

©उमाकांत चव्हाण

सगळे भटके सारखेच..!

तसे मला दोघा-तिघांचे म्हणजेच बिनकामाच्या लोकांचे रिप्लाय देखील आले होते की, ट्रेक चे नियोजन काय ? मी त्यांना काहीही रिप्लाय न देता जाणून-बुजून टाळलं. सकाळी लवकर निघायचं होतं पण उठायला उशीर झाल्यामुळे पाच वाजलेच. साडे पाचच्या दरम्यान भोसले साहेबांना फोन केला की, सहा पर्यंत येतो, तर ते बोलले पाच दहा मिनिट लेट झाला तरी चालेल निवांत या..!

सहाला घर सोडले सानेगुरुजी मध्ये गेल्यावर त्यांना फोन केला, तर ते बोलले "रोडवरच आहे आलोच..!"

एक व्यक्ती एका बाजूने चालत येताना दिसली. वय साधारण पंचावन्नच्या पुढेच..! फ्रेंच कटातली पिकलेली दाढी व मिशा, डोक्याला कॅप, अंगात साधा सदरा, पाठीवर एक सॅक आणि खांद्याला एक शबनम पण भरगच्च भरलेली !

आता या पोतडीत काय काय होतं याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यांना "हॅलो"  केलं आणि ते गाडीवर बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारतच आम्ही कोल्हापूरच्या बाहेर पडलो.

मस्त वातावरण होतं. सकाळचा गारवा.. पूर्वेकडे वरती थोडे ढग आले होते सूर्य उगवला होता पण सूर्यकिरण दिसत नव्हते. अशा वातावरणात कितीही ड्रायव्हिंग केलं तरी कंटाळा येत नाही हा माझा आजपर्यंतचा अनुभव..!

आम्ही गाडीवर गप्पा मारत जात होतो, तेव्हा काही गोष्टी कळल्या हे भोसले सर म्हणजे माझे मित्र रिंकू बिडकर यांचे शेजारी..रिंकूनी परवाच भटकंतीसाठी नवीन जिप्सी घेतली होती रिंकू बिडकर, उमेश नष्टे या भटक्या लोकांशी गेल्या पंधरा-वीस वर्षांची मैत्री, खूप चांगली ओळख. मनसोक्त भटकणारी माणसं, शिवाय कलाकार..! त्यामुळे जंगलात गेले तर यांच्याबरोबर दिवस कसा जातो हे कळतच नाही.

इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या आणि साधारण तासाभराच्या ड्रायव्हिंग नंतर आम्ही कराडमध्ये पोहोचलो. कराडमध्ये तशी माझी नाश्त्यासाठीची नेहमीची दोन हॉटेलं.

गाडी एका बाजूला घेतली आणि त्यांना विचारलं नाष्टा करूया का ? तर त्यांनी लगेच सांगितलं चला "आनंद हॉटेल" मध्ये खाऊया.

ट्रेकर्स मंडळी लगेच खाण्यापिण्याच्या गोष्टी कुठं मिळतात ते लगेच ओळखतात. त्यांनी हे बोलल्यानंतर मला जाणवलं की हे पक्के ट्रेकर आहेत, आत्मविश्वास वाढला व ते व्यवस्थित ट्रेकला येतील यावर खात्री झाली.

हॉटेलमध्ये गेलो आणि भरगच्च इडलीचा नाश्ता केला तिथून बाहेर पडलो. यांना चाळकेवाडीत काही फोटो काढायचे होते त्यामुळे पुढे जाऊन काशीळ मधून एका शॉर्टकटने आम्ही चाळकेवाडी गाठली. तिथे गेल्यानंतर थोडी फोटोग्राफी चालू झाली.

फोटोग्राफी झाल्यानंतर ठोसेघरच्या मार्गे आम्ही साताऱ्यात शिरून पुढे शाहूपुरी, वर्ये करत हायवेला लागलो.


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - ५

©उमाकांत चव्हाण

प्रगती, विकास vs पर्यावरण !

कालचं आंब्याचं शिकरण पोटात गुडगुड करत होतं. एका पंपावर जाऊन पोट साफ केले व पुढे पाचवड फाट्यावर आलो. इथं नेहमीचं भाकरी मिळणारं हॉटेल अंबिका भुवन. मस्त जेवलो आणि पुढे बलकवडीला प्रस्थान केलं.

धरणाचा पट्टा सध्या उन्हामुळे ओस पडलेला दिसला. बालकवडीचा हा रस्ता तसा चांगला आहे. वयगाव वरून जोरच्याकडे एक रस्ता जातो. त्या रस्त्याला न जाता धरणाकडे आलो. समोर काही लोकं भेटली. त्यांना विचारले जोरकडे जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं धरणावरच्या सेक्युरिटी ला विचारा तिथून सोडलं तर जाऊ शकता किंवा मग परत वयगाव वरून मुख्य रस्त्याला लागावे लागेल.

सेक्युरिटीकडे गेलो आणि सांगितले की पलीकडे जायचं आहे. त्यांनी आम्हाला पाणी दिलं विचारपूस करून रस्ता दाखवला. आम्ही धरणाच्या पलीकडे गेलो. 

तिथला भाग म्हणजे घनदाट अरण्यात असलेला पाणथळ पट्टा. गावात गेलो आणि रस्ता संपला तिथून पुढे एक धनगरवाडा आहे तिथवर कच्च्या रस्त्यातून डोंगरातून गाडी घेतली. बांधाबांधातून वर कडेकडेने गाडी चालवत कसाबसा या धनगर वाड्यात आलो.

या धनगर वाड्यात इन-मीन आठ घरे. तिथेच सावलीत गाडी लावली आणि जरा विसावलो. आतून सात-आठ लहान मुलं बाहेर आली. मला युनिफॉर्म वर बघितले आणि माझ्यापासून दूर उभी राहिली. भोसले साहेब एका बाजूला बसले होते त्यांनी बॅगेतून बाटली काढली आणि एका लहान मुलाला पाणी भरून दे म्हणून सांगितलं. ते बिचारं टनाना बेडुकउड्या मारत गेलं तसाच बाटली घेऊन पळत आलं.

दुर्गम वाड्या वस्त्या असलेला माझा देखणा महाराष्ट्र..! 

वैशिष्ट्य म्हणजे इथं थोड्या ठिकाणी रेंज येते, त्यामुळे या वाड्यावर सध्या मोबाईल पोहोचलेला. घरातून वयस्कर आजी बाहेर आली त्यांच्याबरोबर त्यांची सून पाच-सहा मुले मागे होतीच. यांच्याबरोबर आमच्या गप्पा सुरू झाल्या.

खरंतर इथं दिवस घालवायला हवा असे हे ठिकाण. पण आम्हाला वेळ झाला होता. सव्वा चार वाजले होते त्यामुळे पुढे जायचं का नाही ? यावर आमचा विचार चालू होता.

या भागात कसलीही सुविधा नाही, त्यामुळेच कदाचीत इथं निसर्ग अबाधित राहिला आहे.


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - ६

©उमाकांत चव्हाण

सर्व्हायवल ऑफ दी फिटेस्ट

जंगलाचे काही नियम असतात, कायदे कानून न मानणाऱ्या माणसांना जंगलं संपवून टाकते हा आजपर्यंतचा अनुभव पाठीशी आहे. कित्तेक लोकं निसर्गात समोर मरताना पहिली आहेत. कित्तेक बातम्या वाचल्या-ऐकल्या आहेत. नियम न पाळायची आपली (वाईट) सवय जंगलात आणि निसर्गाच्या कोणत्याही भागात चालत नाही.

जंगलांचे नियम मोडले तर जीवानीशीच जाते.

हा साधारणतः सहा-सात किलोमीटरचा जंगलाचा ट्रॅक, जाऊन येऊन बारा-तेरा किलोमीटर होईल. पण सर्व घनदाट जंगलातून..! जरा जरी वाट चुकली, तर शेवटच..! कारण या जंगलात वाघासहित सर्व प्रकारचे प्राणी आहेत आणि ते दिसतात..!

त्यामुळे इथे जाताना या  घरातल्यांनी आम्हाला जाऊ नका ! खूप वेळ झालाय असं सांगितलं. पण मी मनात ठरवलं होतंच की, काही का होईना एकदा या नदीचा उगम तरी पाहून घ्यायचा. मग भले जंगलात रात्री अडकलो तरी चालेल.

तसं महाराष्ट्रातल्या जंगलात मी मी फक्त एकदाच रस्ता चुकलो होतो. त्यावेळी साधारणता माझ्याबरोबर शंभर-सव्वाशे मुलं होती यातही तीस-चाळीस मुली..!

खूप वर्षापूर्वी एकदा रांगणा किल्ल्यावरून नारुरला उतरताना रात्र झाली आणि आम्ही जुन्या दरवाजातून उतरायला सुरुवात केली. वरून धोधो पाऊस चालू होता. माती भुसभुशीत ओली झाली होती. कड्यामध्ये पाय सरकत होते आणि पुढल्या घनदाट जंगलात अंधार-काळोख दाटून आला होता.

अशावेळी एक तर त्या सर्व लोकांची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय कुणालाही ही कसल्याही प्रकारची इजा न होता मला खाली नारूर गावात यांना सुरक्षित पोहोचवायचं होतं. काही मुलं माझ्यापासून दीडशे मीटर पुढे तर काही मुलं दीडशेमीटर मागे. त्यामुळे अशी गत झाली होती की, पुढच्याला सांभाळावं आणि रस्ता दाखवा का मागच्याला सांभाळून यायला सांगावं ? हेच कळत नव्हतं. एकएक पावसाचा जोर वाढला आणि रात्रीचे दहा वाजले त्यावेळी वाट चुकल्यामुळे आम्ही एका ओढ्याच्या काठी थांबलो. कुणाकडेही बॅटरी नव्हती मोबाईलला रेंज नव्हती. पण मोबाईलचा टॉर्च चालू करून सगळेजण चालत होतो.

एका ठिकाणी सगळ्यांना बसवून सगळ्यांना तिथे थांबवलं. या अरण्यात अस्वल आणि बरेच प्राणी असल्यामुळे आग पेटवनं गरजेचं वाटलं. पण पावसामुळे जवळजवळ सगळी लाकडं ओली  झाली होती.

मग हातातील चाकूने एक लाकूड फोडले आणि बॅगमध्ये असलेला फर्स्टएड बॉक्स काढला. त्यातील मूव्हचा स्प्रे काढला व फोडलेल्या लाकडावर तो स्प्रे मारून मारून काडी पेटवून ते लाकूड कसेबसे पेटवले. आग लागल्यानंतर सगळ्यांच्या जीवात जीव आला होता.

त्यात गावातल्या लोकांना थोडी मुलं डोंगरात चुकली आहेत याची बातमी मिळाली होती. गावातून काही लोक कंदील घेऊन या जंगलात आली होती आणि त्यांच्या बोलण्याचे ओरडण्याचे आवाज आम्हाला येत होते. सगळ्या मुलींना एका ठिकाणी बसून मुलांना त्यांच्या भोवती घोळका करायला सांगितला व मी एका मुलाला घेऊन गावकरी ज्या बाजूने येत होते त्या बाजूला डोंगरातून उतरायला सुरुवात केली. काही अंतर चालल्यावर गावकरी भेटले तिथून पुन्हा आम्ही जिथे मुले बसली होती त्या ठिकाणी आलो. अशाप्रकारे रात्री एक वाजता गावात पोहोचलो.

हा अनुभव त्या सव्वाशे जणांमध्ये एकही जण कधीही विसरलेला नाही. शिवाय त्यांच्या आयुष्यात आजवर जे भयानक अनुभव आलेले आहेत त्यातील सर्वात जास्त भयानक म्हणजे हाच असेल असं मला वाटते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व मुले आजही या ट्रेकला सर्वात जास्त थ्रीलिंग आणि जबरदस्त ट्रेक मानतात..!


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - ७

©उमाकांत चव्हाण

सन्नाटा आणि खायला उठलेलं जंगल.

इथं हा किस्सा सांगण्याचा उद्देश हाच की, ही जंगलं महाराष्ट्रातल्या सर्वात घनदाट जंगलांपैकी एक आहेत. त्यामुळे इथे जर चुकला  तर शंभर टक्के चुकीला माफी नाही.

त्यामुळे मी थोडा विचार केला की, पुढचे नियोजन कसे करायचे ? बाटलीत पाणी भरून घेतल्यानंतर आम्ही धनगर वाड्यातल्या लोकांना राम-राम करून पुढे निघालो. एक मळलेली वाट आम्हाला घेऊन चालली होती. ती जशी वळणे घेत होती तसे आम्हीही वळायचो. पुढे त्या वाटेला लागलो खरं, पण काही अंतर गेल्यावर चार-पाच वाटा फुटल्या. त्यामुळे नक्की कुठल्या वाटेला जायचं हेच कळेना.

कसंबसं एक वाट पकडली आणि नेमकी हीच वाट चुकीची निघाली. तसा आजूबाजूच्या वातावरणाचा, दऱ्याखोऱ्यांचा आणि सूर्यप्रकाशाचा अंदाज घेतच मी कायम जंगलात जातो. यावेळीदेखील थोडं पुढे चालल्यानंतर मला जाणवलं ही वाट चुकली आहे. भोसले साहेबांना सांगितले माझ्या मागं या.. आपण वाट चुकलो आहे.

काट्याकुट्यातून आणि कारवीच्या जंगलातून चालत चालत पुढे आलो. एक भले मोठे दगडगोटे असलेली नदी लागली. त्या नदीतून थोडे पुढे आल्यानंतर जंगली जनावरांनी केलेली एक वाट दिसली. थोडा पुढे आलो तर ती वाट पुन्हा कारवीच्या जंगलात गायब झाली होती.

इथं रानडुकरांनी माती उकरलेली होती. आता आली का पंचाईत ! म्हणजे तिथं रानडुकरांचीही कमतरता नव्हती. शेवटी डोक्यात एक विचार आला की, आपल्याला जायचं आहे ते समोरच्या सुळक्याकडे ! म्हणजे नदीचा प्रवाह पकडला तर नक्कीच कुठून तरी आपण उगमापर्यंत पर्यंत पोहोचू शकेन. शेवटी नदीच्या पात्रात उतरायचं ठरवलं. पात्रात पाणी जवळजवळ संपलं होतं फक्त दगड गोटे शिल्लक होते. या दगडगोट्यातून चालायचं ठरवलं आणि कारवीच्या जंगलातून काट्याकुट्यांच्या झाडीत स्वतःला झोकून दिलं.

तिथून पुढे थोडं अंतर चालल्यानंतर एक भाग थोडासा मोकळा वाटला तिथे आल्यावर लक्षात आले की, हा सगळा रस्ताच चुकलेला होता, सगळा भुलभुलैयाच. मग पुन्हा उजव्या बाजूला खाली दरीत उतरायला सुरुवात केली आणि नदीच्या पात्रात पोहोचलो.

आता कुठं जीवात जीव आला म्हणजे जरी बारा-पंधरा किलोमीटर चाललो तर नक्कीच आम्ही कोणत्या ना कोणत्या गावी पोहोचणार याची खात्री होती. ही  अशी खात्री फक्त महाराष्ट्रात देऊ शकतो. कर्नाटकात कोणत्याही नदीच्या पात्रात जर तुम्ही गेला तर किमान ३० ते ४० किलोमीटर चालावंच लागतं तरच आजूबाजूला एखादे गाव भेटतं.

इथं मोकळ्या जागी नदीच्या पात्रात उतरण्याचे आणखी एक कारण म्हणजे, जर कोणताही जंगली प्राणी अंगावर चालून आला तर किमान तो दिसला तरी पाहिजे आपल्याला ! नाहीतर त्या कारवीच्या जंगलात कुठूनतरी एकदम इंग्रजी चित्रपटांच्या सारखा हल्ला झाला म्हणजे मिळवले !

आम्ही या पत्रातून चालायला सुरुवात केली. दगड-गोट्यांचा या पात्रात अस्वलाच्या व बिबट्यांच्या विष्ठा आणि बऱ्याच जंगली हिंस्त्र जीवांचे पावलांचे ठसे आम्हाला पाहायला मिळाले.

माझ्याकडे आज कुठलंही शस्त्र नसल्याने मी शेजारच्या जंगलातून एक कारवीची काठी घेतली होती. ती सोबत ठेवली. किमान आमचं स्वतःचं प्रोटेक्शन तरी करता यावे याकरिता घेतलेली खबरदारी.

या जंगलात सर्व प्रकारचे प्राणी बिनधास्त फिरतात, कारण पण या भागात मानवी हस्तक्षेप खूप कमी आहे. फक्त मे महिन्यात या जंगलात व्यवस्थित फिरता येते.

अन्यथा जानेवारी ते मार्चमध्ये ज्याला जंगलाची चांगली ओळख आहे आणि सर्व्हायवल म्हणजे काय ? हे माहित आहे तोच माणूस या जंगलात येतो. कारण की हे जंगल कुठल्या बाजूने सुरू होते आणि कुठे संपते याचा ताळमेळच बसत नाही. शिवाय झाडाची उंची आणि डेन्सीटी इतकी की सूर्यकिरण दिवसादेखील खाली पोचत नाही.

चालत चालत थोडे पुढे आल्यावर याठिकाणी आम्हाला एक वाट जंगलात आतमध्ये गेलेली दिसली. म्हणजे जी वाट आम्ही चुकलो होतो ती वाट शेवटी आम्हाला सापडली म्हणायची. आता ही वाट सोडायची नाही, असं ठरवलं. या वाटेने पुढे चालणे चालू केले.

आजूबाजूला किर्रर्र जंगल, नाना विविध पक्षांचे आवाज आणि रातकिड्यांची किरकिर यातून जमिनीवर जवळजवळ अडीच ते तीन इंचाचा पालापाचोळ्याचा थर पडला होता आणि त्या थरावर आमच्या पायामुळे होणारे आवाज..! इतकंच काही त्या जंगलात ऐकू येत होतं, बाकी सर्व सन्नाटा...!


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - ८

©उमाकांत चव्हाण

स्तब्धबुद्ध, शंकरश्वास, पद्मशब्द आणि माझ्यातला मी..!

साधारणतः चाळीस मिनिटे चालल्यानंतर हे जंगल परत एका बाजूला आलं आणि आम्ही दुसऱ्या बाजूला निघालो. थोडा चढ चालू झाला होता. जंगलाचा भाग थोडा संपला होता आणि थोडं मोकळं मैदान दिसत होतं.

इथे आल्यावर वरच्या मोठ्या डोंगराकडे सहज नजर गेली हा होता ऑर्थरसीट..! या पॉईंटच्या तळातून आम्ही ऑर्थरसीटकडे पाहत होतो. एकदोन फोटो घेतले एक-दोन सेल्फी घेतल्या व पुढे चालायला सुरुवात केली.

याच जंगलाचा काही भाग रिझर्व फॉरेस्ट मध्ये येतो. तशी मार्किंगची दगडे आम्हाला इथे दिसली. आम्ही त्या बाजूला न जाता बहिरीकडे जायला सुरुवात केली.

बहिरीचं देवस्थान आणि ही घुमटी नक्की आहे कुठे हे गुगलवर सॅटलाईट करून देखील दिसत नाही. ना या भागाचा फोटोग्राफ कुठं आढळतो. या ठिकाणांची कुठलीही गोष्ट पाहता येत नाही. ना इथं कोणी माणसं फिरतात. बहुदा मी काढलेला हा एकमेव फोटो असेल असं माझं मत आहे, कारण मी घरी पोहचल्यावर गुगलवर इथले बरेच फोटो शोधले पण एकही नाही सापडला.

अश्या याठिकाणी जायचं म्हणजे माझ्या आयुष्यातील खरंच संस्मरणीय दिवस ठरणार असं मला वाटलं आणि शेवटी एक जून रोजी या ठिकाणी पोहोचलो. पण एक दुर्दैव वेळ खूप झाला होता. जवळजवळ पावणे सहा वाजून गेले होते. म्हणजे सूर्य मावळतीला पोहोचला होता.

गेले कित्तेक तास आम्ही चालत होतो. आमच्याकडे फक्त अर्धा ते एक तासच हातात होता की ज्या रिझर्व लाईट मध्ये आम्ही परतीचे मार्गक्रमन करणार होतो. त्यामुळे आमच्याकडे जास्त वेळ नव्हता.  जास्तीत जास्त पंधरा मिनिटे..!

इथून पुढे ही वाट जंगलात डाव्या बाजूला वळते. त्यापासून वरती चालायला सुरुवात केली वरती घुमटी चा दगड दिसत होता. पुढं अवघड वळण आणि चढ..थोडं चालल्यानंतर घुमटी जवळ आलो. समोर चक्क २००० फुटांची दरी आणि मागे ऑर्थरसीट पॉईंट आणि कातळकडे..! अशा ठिकाणी येऊन थांबलो होतो. समोर ४ पुरातन काळातील दगडात कोरलेली देव ज्यांना भैरी म्हंटले जातं.. हे भैरी म्हणजेच भैरोबा..! म्हणजे शिवशंकर..

शिवशंकरांचे आणि माझं काय नात आहे मला आजवर कळलेलं नाही. पण हा देव मला प्रचंड आवडतो.. पण तो मला अशाच ठिकाणी भेटतो जिथे कोणी नसतं. निराकार, निर्विकार आणि आत्मिक ऊर्जेचा आनंद भरभरून देणारा. 

मन ज्यावेळेस सैरावैरा होते त्यावेळेस मनाला स्थिरता पाहिजे असते आणि या स्थिरतेसाठी माणूस कायम काही ना काही करत राहतो. पण माझं थोडं उलट आहे मी शांती प्राप्तीसाठी वैराग्य वृत्ती धारण केलेले या जटाधराला भेटायला जातो.

कधी मी त्याला भेटतो तर कधी तो मला भेटतो..! पण अशा ठिकाणी आल्यानंतर त्याचं अस्तित्व या कातळामध्ये मला कायम जाणवतं आणि मग आमच्या दोघांची एकमेकांशी प्रदिर्घ विषयांवर चर्चा होते. आत्मिक समाधान, तृप्ती आणि सात्विक विचार यांचा ताळमेळ या ठिकाणी बसतो. 

भोसले सरांना एका बाजूला बसायला सांगून मी पुढे निघालो. चंद्रगड समोर दिसत होता. मी मध्यभागी होतो आणि माझ्या वरच्या बाजूस या कड्यावर वर एक सुटलेला दगड होता. त्या दगडावर जाऊन मी पद्मासन घातले.

मरायचं असेल तर आजच मरेन, जगायचं असेल तर खाली उडी टाकली तरी तू मला जिवंत ठेवशील. एवढा आत्मविश्वास उरात भरून राहिला होता अगदी कातळकड्याच्या शेवटच्या टोकावर तो उभा असलेला आणि त्यावर मी बुद्ध, शंकर, स्तब्ध, शब्द, श्वास, रोखलेला, थोडासा थकलेला आणि पद्मासनात बसलेला...!

पाच मिनिटातच मी इथं मावळत्या सुर्याकडे पहात डोळे मिटून घेतले आणि शांत बसलो. समोर २००० फूट दरीतून सुसाट अंगावर येणारा वारा आणि मी त्या तुटलेल्या कड्याच्या टोकावर पद्मासनात..!

हा आत्मिक आनंद या जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात कधीही मिळत नाही जो मला त्यावेळेस भेटतो. जेव्हा मी त्याला भेटतो त्याच वेळेस हा मिळतो.  तोही असाच जगाच्या सर्व भौतिक सुखाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आत्मिक आनंदकडे गेलेला..!

खूप मस्त आहे हे..! मला तर वाटतंय की महिन्यातून किमान एकदा तरी या ठिकाणी मी येऊन बसावं. पण हे देखील माहित आहे की इथे येणे फक्त एप्रिल - मे महिन्यातच सहजासहजी शक्य होते.

पावसाचे चार-पाच महिने तरी या जंगलात देखील कोणी पोहोचत नाही. त्यानंतरही तीन-चार महिने या भागातील कुठलीच वाट सहजासहजी सापडणार नाही. त्यामुळे या जंगलात माणसे खूप कमी असतात. अशी ठिकाणे महाराष्ट्रात आजही आहेत हे मला खरच माहित न्हवते. अशी ठिकाणे फक्त मला कर्नाटक केरळ तामिळनाडू या भागात सापडली जिथं माणसं पोहोचतच नाही. तिथे जर तुम्ही गेला तर तिथली शांतता आणि तुम्ही एक होऊन जाता. तुम्ही जगता..!

बहुदा माझ्या पायाच्या हालचालीने एक छोटा दगड पुढे असलेल्या खोल दरीत पडला आणि थोड्या वेळाने मला त्याचा खट्टदिशी आवाज आला आणि मी तंद्री तोडली..!


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - ९

©उमाकांत चव्हाण

शबनमी लाडू आणि मोक्षप्राप्ती

आम्ही आणलेल्या पाण्याच्या बाटलीत आता फक्त चार घोट पाणी शिल्लक होते. भोसले सरांनी दोन आणि मी दोन घोट पिले. पाणी संपल्यामुळे आता जाताना प्रचंड तहान लागणार याची कल्पना आली होती. जंगलाच्या नियमांपैकी एक मी मोडला होता ! ते म्हणजे पाणी संपवायचे नाही.. जो पर्यंत तुम्ही सुरक्षित बाहेर येत नाही. आज तो नियम तोडला मग हाल तर होणारचं..!

सुदैवाने सरांच्याकडे असलेल्या  शबनम पिशवीत रव्याचे लाडू शिल्लक होते. त्यातला एक लाडू या पहाडात त्या दगडावर बसून मी खाल्ला. भूक आणि तहान जगातल्या सर्वात मोठया प्रेरणा आहेत आणि त्याहूनही मोठी जगणं !

काही लोक याला वेडेपणा म्हणतात. पण मला माहिती आहे हे खरे आहे. काही लोकांना वाटतं की असल्या ठिकाणी का जायचं की जिथे कोण जात नाही ? काही लोक म्हणतात की याला वेड लागले आहे जंगलाचे. काही लोकांना वाटतं की उमाकांत आणि जंगल एकच आहे..! मीदेखील घरी अशी आर्टिकल लिहिताना विचार करतो की, असं काय होतं तिथं की मी त्या ठिकाणी जाऊन आलो..? आणि अशी कुठली गोष्ट होती की त्या ठिकाणी गेल्यावर मला स्वर्ग सुख आणि आनंद मिळतो ?

आजवर या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. वेड हे वेड असतं, ते वेड्यासारखंचं करावं, पण वेड जोपासायचे असते त्यात वेडं व्हायचं नसतं..!  पण या वेडात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तो परमेश्वर..!

जो आकाश, वायु, तेज, जल,  पृथ्वी या पंचमहाभूतांत विलीन झालेला आहे तो मला इथेच भेटतो. लोक देवाला भेटण्यासाठी मंदिरात जातात. मी अशा ठिकाणी त्याला भेटतो. कारण मला वाटतं, जिथं माझ्या शरीराला सर्वात जास्त त्रास होऊन माझ्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो आणि माझ्या शरीरातले प्रत्येक अवयव धायमोकलून बेंबीच्या देठापासून विश्रांतीसाठी किंचाळू लागतात, त्यावेळी त्याठिकाणी मी बसलो की तो माझ्या शेजारी येऊन बसतो. मग शरीराला झालेला सर्व त्रास आपोआप नाहीसा होतो.

काही विदेशी पुस्तकात व कंदांबरींमध्ये मी असं वाचलंय की, स्वतःच्या शरीराला सर्वात जास्त त्रास देणे देखील मोक्षप्राप्तीचे मानले गेलेले आहेत. ओपसदे समाज असं मानतो. हे लोक मोक्षप्राप्तीसाठी आपल्या शरीराला अतीव ताण आणि त्रास देतात. हे नक्की आहे ? काय मला माहित नाही. कदाचित असू देखील शकेलं.

पण एक गोष्ट खरी आहे की, ज्यावेळेस चालून चालून माझी पावलं थकून जातात, शरीरातील रक्त घाम बनून अंगभर पसरते, डोळे निस्तेज होतात, पोट आत जाते, पाण्याच्या एका घोटासाठी घसा कोरडा पडतो आणि प्रचंड त्रास होतो, तो क्षण माझ्यासाठी "मी माणूस म्हणून जगतोय" ही गोष्ट मला जाणवून देतो आणि मी सजीव आहे, मला भावभावना आहेत, मला विचार आहेत, माझ्या आजूबाजूला असलेल्या पंचमहाभूतात कधी ना कधी मी विरून जाणार आहे, हे मला जाणवत आणि माझी व त्याची त्या ठिकाणी भेट होते.

लोक देवाला भेटण्यासाठी किती तप-तपश्चर्या करतात हे मला माहीत नाही, पण असल्या गोष्टी केल्यानंतर मला तो सहजासहजी भेटतो हे निश्चितच मला कळून चुकले आहे.

मला तो मंदिरात कधीच दिसला नाही. भले मंदिर त्याचा हक्काचं असेल, पण मी मंदिरात जाऊन त्याला भेटण्यापेक्षा मी जिथे जाईन तिथे येऊन मला भेटतो हे माझ्यासाठी छोटी गोष्ट नाहीये...!

असो या विचारांच्या वादळातून मी बाहेर पडलो. परतीच्या मार्गाला लागलो. आता सगळे सुकर झालं होतं. थकलेले पाय रिलॅक्स झाले होते. मन शांत पाण्यावर पसरलेल्या शांततेत... सगळ्या लाटा निघून गेल्या होत्या. आजही ही अनुभूती सांगताना कदाचित तुम्हाला वाटेल हा जगातलं काहीतरी वेगळे आणि विचित्रच सांगत आहे. पण हा अनुभव वेगळा आहे तो प्रत्यक्ष  घेतल्यानंतरच कळतो की तो आहे काय ?


भटकंती - घुमटीच्या बहिरीची - १०

©उमाकांत चव्हाण

रात शबनमी, भिगी चांदणी..!

हे सर्व अनुभव मी मनाच्या कप्प्यात ठेऊन बाहेर पडलो. जाताना या ठिकानी पुन्हा यायचं आहे, इतकंच मनात ठरवलं. परतीच्या मार्गाला जाताना अंधार झाल्याने आमची पावले झपाझप चालू लागली. आत्ता येताना सापडलेल्या काही पायवाटा पुसट झालेल्या दिसल्या. मघाशी थोडं अंधारातच या वाटा ओळखीच्या झालेल्या, आजकाल पायवाटा देखील माणसांच्या सारख्या अनोळखी वागतात. त्याच वाटेवरून आम्ही परतीला लागलो.

साधारणता दोन तासाच्या जंगलातील काळोख्या पायपीटीनंतर कसेबसे एका ठिकाणी आग लागलेली दिसली. म्हणजे जवळचे एखादी वस्ती असावी असे जाणून या वस्तीकडे चालू लागलो. 

जसजसा हा धनगरवाडा जवळ आला तसे पावलात जीव फुटायला सुरुवात झाली. येताना मात्र रस्ता चुकण्याची शक्यता खूप कमी झाली होती. कारण कुठल्या बाजूला जायचं आहे हे एकदा चुकल्यामुळे चांगलंच लक्षात होते. चुकलेल्या वाटा देखील कधीकधी माणसाला योग्य मार्ग दाखवतात.  त्यामुळे याच बाजूला कितीही चालले तर पुढे जाऊन कधी न कधी आपली गाडी आपल्याला सापडेल आणि तिथून पुढे आपल्याला घरी जिवंत येईल एवढा विश्वास मनात होता.

साधारण सहा-सात किलोमिटर काळोख्या जंगलातून चालल्यानंतर या वाड्यावर पोहोचलो. आजूबाजूची सात-आठ लहान मुलं आमच्या भोवती येऊन बसली होती. मी तर चक्क जमिनीला पाठ लावली आणि सारवलेल्या जमिनीवर भिजलेल्या कपड्यानिशी पाय पसरून आकाशाकडे पहात बसलो..

सगळी नक्षत्रे, तारे आज मला खुणावत होते. ते मोकळं निरभ्र आकाशही हळूच कानात गुणगुणलं, "कुठे आहेस तू ? किती दिवस माझ्या मोकळ्या चादरीत येऊन झोपला नाहीस ? घर मोठं घेतलं की आकाशाला विसरू नये माणसानं !" गर्व झाला की जमिनीचा बेड आणि आकाशाचं पांघरून घेतो मी ! बहुदा गेल्या काही दिवसात काखेमधले लिंबू मोठे झालेत माझ्या. मातीत मिसळल्यावर तिचा स्पर्श, गंध आणि गोडवा मनास धुवून टाकतो.

भोसले सरांनी बॅगेतुन आणलेले खाऊचे पुडे त्या मुलांमध्ये वाटले. ती मुलं जाम खुश झाली. त्यांच्या गप्पा चालू झाल्या. मी फक्त शून्य टक्के पोलुशन असलेल्या निरभ्र आकाशातील चांदण्या इथून मोजू लागलो. प्रत्येक तारा आज मला नवीन आणि जास्त प्रकाश देतोय असं वाटत होतं. 

कधीतरी येऊन दोन-तीन दिवस इथं राहावं, असा मनात विचार आला. कारण जिथं मोबाईलची रेंज नाही, लाईट नाही, कसल्याही प्रकारची गाडी किंवा त्या गाडीचा आवाज येत नाही, कसल्याही  प्रकारचा आर्टिफिशल आवाज नाही अशा शांततेत येऊन राहायला कुणाला नाही आवडणार ?

या जंगलात भटकणे म्हणजे खरंच माझ्यासाठी स्वर्गसुख होते. मोबाईल मधले सापांचे, फुलपाखरांचे काढलेले फोटो आणि काही व्हिडिओ त्या मुलांना मी दाखवत होतो. खूप खुश होऊन ती सगळ बघत होती.

उभ्या आयुष्यात कधीही कलर डिस्प्लेचा मोबाईल न पाहिलेली ही मुलं आज पहिल्यांदाच मोबाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी पाहत होती. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर त्या मिणमिणत्या प्रकाशात मला स्पष्ट दिसत होता. यालाच कदाचित भरून पावणे असे म्हणतात, त्यांच्या डोळ्यात तेज आणि चमक, तर माझ्या डोळ्यात हलकंसं पाणी..!

पाण्याची बाटली भरून घेऊन शेवटी नाईलाजाने त्या लोकांना निरोप द्यायची वेळ आली. इतक्यात म्हातारीच्या घरातून सुनेने कट्ट काळपट चहा आणून भोसले साहेबांनी दिला. भोसले साहेबांसाठी तर हा झुरका म्हणजे अमृततुल्यच..!

चहा पिल्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलो. ज्या वाटेने आलो होतो ही वाट गर्द काळोखात मिसळली होती. त्यामुळे गाडीच्या लाईट च्या उजेडात साधारणता अर्ध्या तासाच्या कसरतीनंतर या वाड्यावरून कसेबसे रोडला लागलो, जाताना वाटेत काजव्यांची जुगलबंदी पाहायला मिळाली.

परतीच्या मार्गाला आलो आणि हायवेच्या अलीकडे काहीतरी खायचं ठरवून हॉटेल शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण दहा वाजून गेले होते. त्यामुळे जवळपास बरीच हॉटेल बंद होती. एका ठिकाणी एक कोल्ड्रिंग हाउस चालू होते. दूध कोल्ड्रिंग घ्यायचं आणि परतीला निघायचे अस ठरवलं.

हायवेला बारापर्यंत धाबे चालूच असतात त्यामुळे भूक लागली तर कुठेतरी खाऊ असे ठरवले आणि त्या कोल्ड्रिंक हाऊस मध्ये गेलो. तिथल्या माणसानं पिस्ता मस्तानी दिली. हे इतकं हेवी होतं कोल्हापूर पर्यंत काही खायची इच्छाच राहिली नाही..!

भटकंती - घुमटीच्या बहिरीची - ११

©उमाकांत चव्हाण.

आठवण..!

हायवेला आलो तसं गाडीचं स्पीड वाढवलं, सकाळपासून जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटर ड्रायव्हिंग झालं होतं, त्यामुळे पाठ प्रचंड दुखत होती.

 सध्या गेल्या आठवड्यात पाठीत चमक भरली होती त्यामुळे जिम आणि योगा दोन्ही बंद होते. त्याचा त्रास आता जाणवू लागला. वाटेत एक-दोन ठिकाणी गाडी लावून हायवेला एका बाजूला झोपलो. पाठ टेकवली तीन फुटांवरून शंभर-सव्वाशे स्पीडने गाड्या आणि वोल्वो बसेससारखी मोठी वाहने सुसाट वेगाने जात होती. हा अनुभव देखील खूप वेगळा आहे.

थोडं पाणी पिलं, परतीच्या प्रवासाचा श्रीगणेशा केला.

कराडच्या पुढे कासेगाव जवळ सारा हॉटेलमध्ये मी कायम कॉफी घेतो. मी कॉफीचा दिवाना तर हा कॉफीचा दर्दी. दुर्दैवानं आज हॉटेल रात्री बंद होत. मग कुठेही न थांबता सर्व कोल्हापूर गाठले. 

रात्री एक-सव्वा एकच्या दरम्यान कोल्हापुरात पोहोचलो. भोसले साहेबांना घरी सोडून मी "चैत्रवेल" मध्ये पाऊल ठेवले.

आल्या आल्या हातपाय धुवून एक ग्लास दूध पिले आणि बेडवर कधी आडवा झालो कळलंच नाही, झोप मोडली ती पहाटेच्या पाचच्या गजरने. 

दुसऱ्या दिवशी रविवार, आणि मी फक्त हे आर्टिकल लिहणार इतकंच काम माझ्याकडे...!घुमटीच्या बहिरीची आठवण मात्र कायमची मनात घर करून गेली..

जर उंचीची भीती नसेल आणि जीवावर उदार होऊन काहीतरी करायचे असेल तर इथं एकदा जाऊन यावचं असं हे ठिकाण कायमचं आठवणीत राहिलं आहे..! (कृपया वाचकांनी हे लक्ष्यात ठेवावे की, कातळकडे धोकादायक असू शकतात, परिपूर्ण रॉक कलाइम्बिंगचे आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे ट्रेंनिग घेतल्याशिवाय असल्या ठिकाणी जाऊ नये, ते धोकादायक ठरू शकते, कित्तेक लोकांना अश्या ठिकाणी जीवास मुकावे लागले आहे.)

उमाकांत..!

https://www.youtube.com/channel/UCEr-x9GypxAMeTTym9nmRuQ


घुमटीच्या बहिरीची निमित्ताने एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे निसर्ग खूप मोठा आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतका मोठा..! 

आपल्या कल्पनेच्या सीमारेषा जिथे संपतात, तिथं निसर्गाची जीवनरेषा सुरू होते आणि त्यानंतर जे दिसतं, जे भासतं, जे असतं.. ते आहे निसर्गाचे विराट स्वरुप...!

आपण कितीही मोठे झालो तरी निसर्गाच्या पायाजवळ देखील पोहोचू शकत नाही, हे जाणवलं..

हा दिवस माझ्यासाठी इतका सुंदर होता की या दिवसात मला माझ्यातला, "मी" सापडलो.. ! आयुष्यातून जगण्याचं मूळ सापडणे म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील खूप मोठा आनंद दडलेला असतो, हे त्या धनगरवाड्या वर असलेल्या मुलांच्या मळकट झालेल्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यावर जानवलं.. 

देशात करण्यासारखी भरपूर कामे आहेत ही सगळी कामे सोडून लोक नको ती, नको त्या पद्धतीने टाइमपास का करतात ? असे देखील वाटलं.

या समाजाला शिक्षणाची गरज आहे, पण या समाजाला शिक्षण आणि संस्कृती या दोनच गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकवायची गरज वाटली, कारण की निसर्ग आणि जंगल हे त्यांनी अतिशय सुंदर जपलेलं आहे. त्यांना जर आयता कष्ट न करता इथून पैसा कसा मिळतो हे समजले तर निश्चितच ही लोक देखील हे जंगल जास्तच खराब करायला मागेपुढे पाहणार नाहीत. 

आज समाजात, जंगलाच्या जीवावर, वन्यजीवांच्या जीवावर आणि फोटोग्राफी म्हणून जंगलांची जी नासधुस चालू आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहतोय, किंबहुना त्याच क्षेत्रात असल्यामुळे मलाही ते भासतय.

या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत नुसतं जाऊन चांगले फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करणे, म्हणजेच जर वाइल्डलाइफ फोटोग्राफी असेल तर आजकाल प्रत्येक घरात एकतरी फरान कुरेशी जन्माला आलेला आहे.

प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये कॅमेरा आहे आणि त्या कॅमेराचा नको इतका वापर आपण सर्रासपणे करतो. काही चांगल्या ठिकाणी होतो, तर काही ठिकाणी वाईट..!

हे नक्कीच मी सांगू शकतो. आपण काढलेल्या जंगलातील वन्यजीवांच्या प्राण्यांचे आणि त्या फोटोंचे पुढेमागे सत्कर्मी लागण्यासारखे काहीतरी होत असेल तर त्या फोटोला अर्थ आहे..! नाहीतर तुम्ही केलेली मेहनत आणि जंगलांची नासधूस हे सर्व व्यर्थ आहे..! 

जंगलात फक्त फोटोग्राफी करण्याकरिता जाण्यात काही अर्थ नाही या संपूर्ण दिवसात मी फक्त आठ ते नऊ फोटो या जंगलात काढले असतील. एरवी जंगलात गेल्यानंतर मला पन्नास फुटाचा रेडीएस मध्ये किमान शंभर दीडशे फोटो मिळतात. माझी नजर तितकी चौकस झालेली आहे.. पण का कुणास ठाऊक काल एक आगळ्यावेगळ्या ओढीन घुमटीच्या बहिरी ला गेलो होतो..! त्यामुळे या भागात फोटो काढणे ही कन्सेप्टच माझ्या आजूबाजूला फिरली नाही.

मी स्वच्छंद दिलखुलास मोकळ्या आकाशात गरुडासारखा भरारी घेत होतो आणि माझ्यासमोर होते निर्गुण, निर्भय आणि निराकार असं विश्व..!

जे सध्या या सिमेंटच्या जगात पाहायला मिळत नाही. हा आत्मिक आनंद मिळवण्याकरिता किती कष्ट करावे लागतात याची जाणीव देखील इथेच झाली.

गावातल्या वाड्या-वस्त्यांवर राहणारी हि लोक निसर्गाच्या इतक्या जवळ आहेत तरीदेखील त्यांना त्यांनी निसर्गाची १००% व्हॅल्यू माहिती नाही, किंबहुना ती माहित नाही म्हणूनच ते जंगल सुस्थितीत आहे, असे देखील वाटलं. 

माझ्या देवराईच्या पुस्तकात मी याची नोंद केली आहे की, धनगरवाडे, हरिजनांचे थळ आणि खेड्यापाड्यात डोंगर वस्तीत राहणाऱ्या या लोकांनीच पर्यावरण सर्वात जास्त जपलं..

त्यांच्यातील रूढी परंपरा आणि जंगलाबद्दल असलेली आदर युक्त भीती यामुळे त्या जंगलातली वन्यजीव संपदा आणि दुर्मिळ वृक्ष जपले गेले. 

पण आजकाल कायदे कानून सोडून देवालाही न घाबरणाऱ्या  मानवाने सृष्टीचा विनाश चालू केलेला आहे. जो कधी ना कधी त्याच मानवाच्या मुळावर येऊन घाव घालणारे यात शंकाच नाही...!

More details about wildlife and my articles... Stay connected with my page and blog...


किल्ले जीवधन

  जिल्हा -पुणे घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. इतिहास :...