© उमाकांत चव्हाण | Umakant Chavan.
तुमच्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लोक डाऊन केला, सगळेजण सध्या घरात बसले आहेत. आम्ही मात्र बिनधास्त फिरत आहे जंगलामध्ये...!
तुम्हाला घरामध्ये दहा दिवसात जो "लॉकडाऊन" चा अनुभव आलाय तो गेली कित्येक वर्ष आम्ही तुमच्या या अघोरी पर्यटनामुळे जंगलात अनुभवतोय...
तुम्ही आमच्या जंगलात बोंबलत फिरता आणि तुमच्या भेटीमुळे आम्हाला एकाच ठिकाणी घाबरून जीव मुठीत धरून बसावे लागते.
शेवटी तुमच्या पंतप्रधानांनी आम्हाला मुक्त केले याबद्दल त्यांचे धन्यवाद.
सध्या आम्ही निर्धास्त रस्त्यावर गावातून, शहरातून, जंगलातून फिरत आहोत. जग किती मोठ आहे हे आम्हाला कधी दिसलच नाही, कारण आम्हाला आमच्या घरात मानवाने कायमचे "लॉकडाऊन" करून ठेवले होते. खूप इच्छा व्हायची की थोडसं भटकून याव, पण आम्ही जंगलाच्या आजूबाजूला जरी दिसलो, तरी तुमच्यातले लोक आम्हाला हौसेखातर आणि पैशासाठी गोळ्या घालून ठार मारायचे. मग आम्ही आमचं ते सुख, आमचा आनंद, गुंडाळून ठेवून मरणाच्या भेटीने जगण्यासाठी धडपड करत आमच्याच उरल्यासुरल्या तुकड्याच्या (तुकडे तुम्ही केले) जंगलात "लॉकडाऊन" असायचो.
कसं वाटतय आता ? खरं सांगा ना !
एखादा लॉक डाऊन असणे म्हणजे जीव वाचवणे आहे, परंतु ती एक दुर्दैवी सजा आहे हे तुम्हाला गेल्या दहा दिवसात कळलंच असेल.
आम्ही ती गेले कित्येक वर्ष भोगतोय..आमच्या जंगलात... आमची चुक नसतानाही... फक्त तुमच्यामुळे...
इथून पुढे आम्हाला जंगलामध्ये "लॉकडाऊन" करताना भारतात झालेले लॉकडाउन एकदा आठवुन बघा...
चारही बाजूला फेन्सिंग आणि जाळ्या लावून तुम्ही आम्हाला आमच्या उरल्यासुरल्या छोट्याशा जंगलात बंदिस्त करून टाकलं, कित्येक पक्षी एक बाय दोनच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झालेले आहेत. धडपड चालू आहे ती जगण्याची... पंख फडफडवून निळ्या आकाशी झेप घेण्याची... परंतु ही स्वप्न देखील त्यांची आता संपली आहेत. कारण की त्यांना आयुष्याने कायमचे लॉकडाऊन केलेले आहे.
कर्नाटकात रस्त्यावर फिरणारे गवे, हरणं, हत्ती, मुंबईमधे या रस्त्यांवर मुक्तहस्ताने आपल्या या सुंदर पिसाऱ्यांचे रंग पसरणारे मोर..! हे सध्या लॉकडाउन मुळे बाहेर आलेले आहेत.
हजारो वर्षानंतर त्यांना आपली पृथ्वी पाहता आलेली आहे. ही त्यांची पिढी खरंच खूप भाग्यशाली आहे, कारण की आम्ही तुम्ही केलेल्या लॉकडाउन मध्येच आमचं सर्व आयुष्य संपवले...किमान या पिढीला तरी मुक्तपणे रस्त्यावर फिरता आले.
तुम्ही निसर्गावर-प्राणिमात्रांवर जो अन्याय केलाय तोच तुमच्या मुळावर कधीनाकधी उठणार, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा..!
आमचा बदला तो निसर्ग कधी ना कधी तुमच्याकडून योग्य पद्धतीने घेणारच विचार करा आणि कदाचित या रोगामुळे तुमचे "स्वातंत्र्याचे आणि लॉकडाऊन" चे विचार बदलतील...!
तुमच्या लॉकडाऊन मुळे जंगलामध्ये स्वतःचे आयुष्य संपवलेला - एक वन्यजीव..!